भुसावळ – नगर परिषद अध्यक्ष तसेच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांनी येत्या आठ दिवसात शहरातील विविध प्रलंबित विकास कामांना सुरुवात करून कामे उत्कृष्ट दर्जाची करावी अन्यथा पदांचे राजीनामे द्यावेत अशी मागणी जळगांव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.विवेक नरवाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

या मागणीला सत्ताधारी भाजपने प्रतिसाद दिला नाही तर नगर परिषदेचे काम बंद पाडण्यात येईल असा इशाराही श्री नरवाडे यांनी दिला आहे.
भुसावळ नगर परिषदेत सत्ताधारी भाजपने गलथान,मनमानी व भ्रष्टाचारी कारभार चालवण्याचा कळस गाठला आहे.एवढंच नाही तर मा. पालकमंत्री यांनी आदेश दिल्या नंतर सुद्धा केवळ मुरूम टाकून डागडुजी करून मा. पालकमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे.शासनाचा निधी उपलब्ध नाही असे सांगून जनतेला वेठीस धरण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे आणि ते अत्यंत चुकीचे आहे.शासनाचा निधी उपलब्ध असलेली विकास कामे सुरू करण्याबाबत येत्या आठ दिवसांच्या आत आवश्यक ते ठराव मंजूर करून कामाचे आदेश काढावेत. नगराध्यक्ष व सत्ताधारी नगर सेवकांच्या वाटाघाटी भुसावळातील जनतेला वेठीस धरू नका,विकास कामे चांगल्या दर्जाची करायची नसतील तर तुम्हाला खुर्ची अडवून ठेवण्याचा काहीएक अधिकार नाही असेही श्री नरवाडे यांनी सांगितले आहे.


