सातारा : महिलेने दोन मुलांचा गळा आवळून खून करीत स्वतःदेखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कराडच्या रुक्मिणीनगरात बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हर्ष (8) व आदर्श (6) अशी मयत दुर्दैवी मुलांची नावे असून अनुष्का सुजीत आवटे, असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. पतीचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाल्यानंतर विरहात महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले.
घटनास्थळी पोलीस अधिकार्यांना त्या आशयाची चिठ्ठी सापडली आहे.

सहा महिन्यांपूर्वीच पतीचे निधन
अनुष्का आवटे या कराडच्या रुक्मिणीनगरात वास्तव्यास ऊन त्यांचे पती सुजीत हे सहा महिन्यांपूर्वीच अपघातात दगावले. पतीच्या निधनामुळे आपण व्यथित असून, त्यांच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, अशी चिठ्ठी लिहून अनुष्का यांनी पोटच्या पोरांचे गळे दाबून खून केले. त्यानंतर त्यांनी बुधवारी दुपारी विषप्राशन करून, स्वत:च्या हाताची नस कापली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइक व परिसरातील नागरिकांनी आवटे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी दोन्ही मुले मृतावस्थेत दिसली. अनुष्का यांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाइकांनी त्यांना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चिमुकल्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. सलग दुसर्या दिवशी झालेल्या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे कराड शहर हादरले आहे. अनुष्का यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक डॉ.रणजीत पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांनी घटनास्थळी भेट दिली.


