भुसावळ – महाराष्ट्र संतांची भूमी आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या वारकरी संप्रदायाच्या पायाला अनुसरून आतापर्यंत अनेक संतमहंतांनी भागवत धर्माची धुरा अत्यंत प्रेमपूर्वक सांभाळली आहे. आज हजारो कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आपले महत्त्व टिकवून आहे. यातीलच एक ज्येष्ठ कीर्तनकार, श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते व प्रवचनकार श्रीहभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांचे नाव घेता येईल. वडील झिपरू पाटील यांच्याकडून आध्यात्मिकतेचा वारसा घेऊन अगदी बालपणापासूनच भागवत धर्माची गोडी लागलेल्या लक्ष्मण महाराज चिखलीकर यांचा गेल्या चाळीस वर्षांपासून भागवत धर्माचा ज्ञानयज्ञ अव्याहतपणे सुरू आहे. बोदवड तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावी 2 जून 1952 रोजी झिपरू पाटील व केशरबाई पाटील या दाम्पत्याच्या पोटी लक्ष्मण महाराज यांचा जन्म झाला. वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवत अगदी बालपणापासूनच श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान येथील दर्शनाची ओढ त्यांना लागली. त्यामुळे त्यांनी दर महिन्याच्या एकादशीला मेहूण येथे जाऊन दर्शनवारी सुरू केली. दरम्यानच्या काळात कामानिमित्त रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे जाऊन अतिशय कष्टाची कामे केली. तेथूनही त्यांनी आपली वारी कधी खंडित होऊ दिली नाही. धार्मिक व आध्यात्मिकतेची आवड जोपासता जोपासता त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी कीर्तनकाराची भूमिका निवडली. त्यानुसार श्रीहनुमान जयंतीचे औचित्य साधून तांदलवाडी येथील श्रीराम व श्रीहनुमान मंदिराच्या आवारात त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिले कीर्तन सादर केले. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात हजारो कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू ठेवला आहे. सुमारे पाचशेच्यावर श्रीमद्भागवत कथा त्यांनी सांगितल्या असून हजारो प्रवचने देखील केली आहेत. त्यांची सादरीकरणाची पद्धत अप्रतिम आहे. एखादा अध्यात्माचा विषय श्रोत्यांना समजावून सांगताना ते पुराणकथांचा संबंध आधुनिक जीवनाशी जोडून जीवन कसे जगावे हे अतिशय सोप्या, सहज व सुलभ भाषेत समजावून सांगतात. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणाची हातोटी व कौशल्य श्रोत्यांना खूप आवडते. अनेक ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून देखील ते जनप्रबोधन करत आहेत. त्यांनी अनेकांना धार्मिक व आध्यात्मिकतेची गोडी लावून वारकरी संप्रदाय व भागवत धर्मासाठी तयार केले. आज वयाच्या सत्तरीत असतानादेखील त्यांचा अध्यात्माचा वसा अखंडित सुरू आहे. अशा पद्धतीने परमार्थ करत असताना त्यांनी प्रपंचाकडे कधी दुर्लक्ष केले नाही. मुलगी सविताचे थाटामाटात लग्न लावून दिल्यानंतर ती आज सुखाने संसार करत आहे. मुलगा मनोज याचे शिक्षण झाल्यानंतर त्याला व्यवसाय थाटून दिला. सर्वात लहान मुलगा जगदीश याने उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याला शिक्षणाप्रमाणे शिक्षकाची नोकरी लावून दिली. प्रपंच आणि परमार्थ या दोघींचा सुयोग संगम साधत लक्ष्मण महाराज यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल भगवंताच्या नामस्मरणात सुरू ठेवली आहे. एवढेच नव्हे तर पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी या कार्याला हातभार लावला आहे. संत मुक्ताई आरतीचे रचयिता अॅड. गोपाल दशरथ चौधरी यांच्या श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई गाथ्याच्या प्रकाशकाची भूमिका त्यांनी समर्थपणे सांभाळली. तसेच असे सोमेश्वर पुरातन या ग्रंथाचे प्रकाशकही ते आहेत. या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशक म्हणून जबाबदारी सांभाळून आदिशक्ती मुक्ताईच्या प्रचाराचे कार्य ते करत आहेत. आजही नित्यनेमाने श्रीक्षेत्र मेहूण येथील वद्य एकादशीची मासिक वारी, श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र आळंदी येथील दरवर्षीची वारी अखंडितपणे सुरू आहे. दोन जून हा त्यांचा जन्मदिवस. जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वारकरी हात तयार होवो, त्यांचा भागवत धर्माचा ज्ञानयज्ञ अखंडितपणे सुरू राहो आणि त्यांचा आशीर्वाद सर्वांना लाभाे, हीच मुक्ताईचरणी प्रार्थना. (डॉ. जगदीश पाटील, 8149498020)