महिलांबाबत योग्य सामाजिक वर्तनाची गरज- पास्टर स्वप्निल नाशिककर ;

अँड. ऐश्वर्या आठवले लिखीत ‘भारतातील महिलांबाबतचे गुन्हे : कायदा व समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळ (प्रतिनिधी )-

स्त्री-सुरक्षेच्या दृष्टीकोनातून न्यायपालिकेच्या भूमिकेसह सद्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी व महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण यावे यासाठी महिलांविषयीचा आदर आत्मसात करून समाजात त्यांच्याबाबतच्या योग्य सामाजिक वर्तनाची गरज असल्याचे प्रतिपादन भुसावळ येथील अलायन्स मराठी चर्चचे धर्मगुरू पास्टर स्वप्निल नाशिककर यांनी येथे केले.
भुसावळ येथील दूर्गा कॉलनीत आयोजित पुस्तक प्रकाशनावेळी पा. नाशिककर बोलत होते. प्रारंभी अॅड. ऐश्वर्या आठवले लिखीत ‘भारतातील महिलांबाबतचे गुन्हे : कायदा व समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन पास्टर स्वप्निल नाशिककर, बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील, श्रीसंत गाडगे महाराज हिंदी विद्यालयातील पर्यवेक्षक प्रमोद आठवले व प्रकाशक रिबेका आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महिलांना सक्षम बनविण्यासाठी भारताला भक्कम घटनात्मक पाया आहे. महिला संरक्षणासाठी पुरेसे कायदे आहेत, परंतु तरीही महिलांबाबतचे गुन्हे होतच असतात. स्त्रियांवरील वाढत्या गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या मुख्य घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न आणि सोबतच कायदेशीर बाबींचा समावेश या पुस्तकात असल्याचे लेखिका अॅड. ऐश्वर्या आठवले यांनी सांगितले. महिलांबाबत घडणारे गुन्हे या राष्ट्रीय समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी समाजात जनजागृतीची गरज असून या पुस्तकाच्या माध्यमातून कायद्याच्या माहितीसह स्त्रीयांबद्दलचा आदर वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. जगदीश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद आठवले यांनी तर प्रकाशक रिबेका आठवले यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सतीश कवटे व अनोश आठवले यांनी परिश्रम घेतले. अॅड. ऐश्वर्या आठवले यांचे हे पहिलेच पुस्तक असून ते इंग्रजी भाषेत आहे. या पुस्तकाला अॅड. राजेश उपाध्याय यांची पाठराखण असून डॉ. जगदीश पाटील यांचा अभिप्राय आहे. प्रकाशकाची भूमिका रिबेका आठवले यांनी सांभाळली असून प्रशांत पब्लिकेशन्स जळगाव यांनी हे पुस्तक छापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *