भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने दिनांक ७ ऑगष्ट २०२० ते १७ सप्टेंबर २०२० पर्यंत किसान रेलच्या १२ फे-यांमध्ये ३,१६९ टन शेती उत्पादन व इतर पार्सलची वाहतूक केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेवर भारताची पहिली किसान रेल्वे दिनांक ७ पासून देवळाली ते दानापूर दरम्यान या भागातील शेतक-यांना त्यांचे शेतीमाल देशाच्या दुर्गम भागात त्वरित आणि आर्थिकदृष्ट्या परवडणा-या दरात पाठविण्यात मदत व्हावी यासाठी साप्ताहिक ट्रेन म्हणून सुरू केली.
या उपक्रमाला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नंतर ही गाडी मुझफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली आणि मुख्य किसान रेल्वेला जोडण्यासाठी लिंक किसान रेल्वे सांगोला पुणे येथूनही सुरू झाली. किसान रेल आता दि. ८.९.२०२० पासून आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. आतापर्यंत किसान रेल्वेने १२ फे-या पूर्ण केल्या असून ज्यामध्ये डाळिंब (अनार), शिमला मिरची, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फ-मासे आणि इतर पार्सल यासारख्या ३,१६९ टनाहून अधिक नाशवंत वस्तुंचा समावेश आहे.
सोलापूर विभागातील सांगोला, मोडलिंब, बेलवंडी, बेलापूर आणि कोपरगाव स्थानकांवर पीओएस मशिन बसविण्यात येऊन किसान रेलमध्ये शेती उत्पादनांची बुकिंग करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे, त्याचा सुलभ व त्वरित व्यवहारासाठी शेतकऱ्यांना फायदा होत आहे.



