१५ सप्टेंबर पासुन “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियानाची सुरुवात : जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचे सखोल आरोग्य सर्वेक्षण :


जळगाव –
कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून दि.
१५ सप्टेंबर, २०२० पासुन “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियानाची सुरुवात होत आहे.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या अभियानाच्या पुर्वतयारीचा भाग म्हणुन दि. १२ सप्टेंबर, ते
दि. १५ सप्टेंबर, २०२० या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचे सखोल
आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्य सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागात गाव पातळीवर व नागरी भागात
प्रभाग पातळीवर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत, यात शासनाच्या विविध विभागांचे
कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य यांचा समावेश आहे. नियुक्त पथके आपल्या घरी भेट देवुन ५०
पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करतील
कोरोना या साथरोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्ण औषधोपचाराने बरा होतो, जिल्ह्यात
सद्यस्थितीत २५,८४६ रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. परंतु, लक्षणांकडे व आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रोग
बळावतो व रुग्ण गंभीर अवस्थेत जावुन रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपल्या घरी भेट देणाऱ्या
पथकांना सहकार्य करुन त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपुर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबांचा
कोरोना या साथरोगापासुन बचाव करावा.असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *