भुसावळ एज्युकेशनल बँक” उपक्रमाची सुरूवात ; गरिबांचा शैक्षणिक प्रवास सुकर करण्याचा प्रयत्न: प्रा.धिरज पाटील


भुसावळ (प्रतिनिधी )-
करोनाच्या भीतीमुळे सर्वच शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात शाळांनी वार्षिक परीक्षाही रद्द केल्या. या प्रादुर्भावाचा विळखा संपेल, असे सर्वांना वाटत असताना दिवसेंदिवस तो वाढत आहे. शाळा सुरू होतील की नाही, हा देखील प्रश्नच आहे. ऑनलाईन पध्दतीने शिकवायचे झाल्यास विद्यार्थ्यांकडे आवश्यक साधन सामुग्री असलीच पाहिजे. यावर तोडगा म्हणून भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी “भुसावळ एज्युकेशनल बँक” या उपक्रमाची सुरूवात केली आहे.
हल्ली विद्यार्थ्यांची पुस्तक नीटनेटकी असतात. त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी पुस्तक बँकेच्या माध्यमातून ती उपलब्ध होतील व गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळेल हा या उपक्रमाचा उद्देश्य आहे. आपली मदत एखाद्या गरजू विद्यार्थ्याचे भविष्य घडवू शकते, असे आवाहन करत विशाल ठोके, हर्षल पाटील, अमोल पाटील, फिरोज तडवी, गोकुळ बाविस्कर, सुरज पाटील, सुरेंद्र सोनवणे यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संकलित करण्याची मोहीम सुरू केली आहे. कोणावरही सक्ती न करता स्वेच्छेने जे मदत करतील ती विद्यार्थ्यांसाठी संकलित केली जात आहे. नवीन किंवा जुनी पुस्तके, स्कूलबॅग, वॉटरबॅग व शाळेसाठी साहित्य मिळविले जात आहे.
मदत पडली अपुरी: प्रा.धिरज पाटील
शैक्षणिक साहित्य संकलनाच्या मोहिमेविषयी माहिती देताना प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले की, यावर्षी कोरोनामुळे हवालदिल झालेले सलून, पानटपरी व्यावसायिक, वाजंत्री, टेंट हाऊस, छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक यांच्या मुलांना मोफत पुस्तके व साहित्ये दिली पण कोठेतरी आर्थिक बाजू कमकुवत पडली आणि मदत थांबली. मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले पालक त्यांच्या मुलांना प्रत्येक वर्षी नवीन शैक्षणिक साहित्य घेतात. परंतु दुसरीकडे गरीब मुलांना आवश्यक तेवढेही साहित्य मिळत नाही. या सर्वांचा शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
पुस्तके रद्दीत देऊ नये:
बरेच विद्यार्थी आपल्या अभ्यासक्रमानंतर आपली पुस्तके रद्दी मध्ये देतात किंवा धूळ खात पडतात ज्याच्यात नुकसान दोघांचेही होते. एक तर ही पुस्तके गरजूंपासून दूर रहातात आणि त्यांच्या नव निर्मिती साठी पर्यावरणाची पण हानी होते. पुढील दहा दिवस ही मोहीम सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *