भुसावळ(प्रतिनिधी )-
महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक वस्तु निर्मिती क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी आहे. सध्या कोरोनामुळे ठप्प झालेले व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. परंतु इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. टेलीकम्युनिकेशन (दूरसंचार) च्या मदतीने घरी राहून काम करणाऱ्यांना देखील इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मोठी मदत झालेली आहे. पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राची मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करतील व आपल्या ग्रामीण भागातील इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमच्या अभियंत्यांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. येणाऱ्या काळात ही इंडस्ट्री गेम चेंजर ठरेल असे मत, भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागाच्या वतीने आयोजित “इलेक्ट्रॉनिक्स- टेलिकॉम व कोरोनासोबतचे विश्व” या विषयावर आधारित वेबिनारमध्ये मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.दिपक खडसे, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.नीता नेमाडे, प्रा.दीपक साकळे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.धिरज पाटील व महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंडस्ट्री भारतातील सर्वात मोठे उद्योग:
तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे व्यक्तीला कुणावरही अवलंबून रहावे लागत नाही. वाढत्या वेबसाईटस, वाढते इंटरनेट वापरकर्ते. यांच्याबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंडस्ट्री देखील भारतातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक बनली आहे. जिथे नोकरी बरोबरच घरातूनही काम करण्याच्या अनेक संधी मिळतात. सोबतच कंपन्यांमध्ये दूरसंचार अभियंता, सिस्टिम डेव्हलपर, दूरसंचार प्रबंधक, दूरसंचार विश्लेषक म्हणून कार्य करण्याची संधी मिळणार आहे असे प्रा.स्मिता चौधरी यांनी सांगितले.
भारत स्मार्टफोन निर्यातीचे केंद्र बनेल:
मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारतात स्मार्टफोनची निर्मिती करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यानुसारच इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक कंपन्यांना आमंत्रण देण्यासाठी भारताने तयारी दाखवल्यानंतर अनेक कंपन्यांना भारतात येण्याचा मोह होऊ लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम क्षेत्रातील तेजीमुळे देश-विदेशातील गुंतवणुकदार या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सज्ज झाले असून सॅमसंग, अॅपल कंपनीला स्मार्टफोन देणाऱ्या फॉक्सकॉन व विस्ट्रॉन या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत मुसंडी मारण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यापुढे एक पाऊल टाकत स्मार्टफोन व त्याला लागणारी उपकरणे यांच्या निर्यातीचे लवकरच भारत हे केंद्र बनेल असा विश्वास डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी दर्शविला.



