भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी जाहीर झाल्यानंतर तब्बल चार ते पाच दिवसांपासून नागरीक घरातच थांबून आहेत मात्र कुटुंबाच्या उदननिर्वाहासाठी जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असलीतरी केवळ सकाळी सहा ते दहा ही वेळ देण्यात आल्यानंतर किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गर्दी होत होती. या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती असल्याने आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुले ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भुसावळातही किमान १४ ते 1६ तास दुकाने उघडी राहणार असल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे व एकदाच किराणा, भाजीपाला, औषधे आदी वस्तूंची खरेदी करावी मात्र विनाकारण छोट्या-छोट्या गोष्टींचे निमित्त करून बाहेर पडल्यास अशा लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्याचा इशारा पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दिला आहे.
नागरीकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत जाण्याची दिवसभर मुभा आहे मात्र एकापेक्षा जास्त संख्येने विनाकारण नागरीकांनी बाहेर पडून गर्दी करू, नये असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले आहे. रस्त्यावर नागरीक आल्यानंतर त्यांना मारहाण होणार नाही याबाबत संबंधित कर्मचार्यांना सूचना करण्यात आल्या आहेत मात्र क्षुल्लक-क्षुल्लक गोष्टींसाठी नागरीक बाहेर पडत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई होवून त्यांची वाहने जमा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्याचे राठोड म्हणाले.

*नागरिकांनी संयम राखावा ;गर्दी करु नये – मुख्याधिकारी
दरम्यान जीवनावश्यक वस्तू नागरीकांना मिळण्यासंदर्भात पालिकेतर्फे रीक्षाद्वारे उद्घोषणाद्वारे सूचना केल्या जात आहेत. प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्याशी २४ तास दुकाने ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच अनेक व्यापार्यांनीही आपल्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी पालिकेतर्फे शहरात सूचना दिल्या. नागरीकांनी विनाकारण रस्त्यावरील गर्दी टाळून घरी होम डिलीव्हरी मागवावी, असे आवाहनही केले आहे.
रस्त्यावर विनाकारण गर्दी करु नका असे आवाहन नागरिकांना प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी केले आहे . नागरीकांनी विनाकारण रस्त्यावरील गर्दी टाळावी व गरजवेळी एकट्याने बाहेर पडावे, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोणीही घाबरु नये आपणास वस्तु मिळतील असेही सांगितले .


