भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्यात झालेल्या
अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपीट संदर्भात सभागृहात खा.रक्षा खडसे यांनी बळीराजाच्या समस्या मांडल्या असून शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जाण्यासाठी हातभार लावावा याकरीता राज्य व केंद्र
नुकसान भरपाई जाहीर करावी तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली .
गेल्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील जळगाव जिल्ह्यात 30,000 हेक्टर, बुलढाणा जिह्यात 35,000 हेक्टरवर गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांचा फटका बसला. रावेर लोकसभा मतदारसंघातील जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ, चोपडा येथे केळी व रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे गहू, हरभरा, मका, कांदा, भुईमूग या तयार व उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे व चिंताग्रस्त आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे पंचनामे सुरू आहेत. राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकारनेही नुकसान भरपाई जाहीर करावी आणि त्यासोबतच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे दावे शेतकरी दाखल करतील त्यांना सुद्धा लवकरात लवकर विमा भरपाई मिळावी आणि शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जाण्यासाठी हातभार लावावा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी सभागृहात मागणी केली.



