भुसावळ (प्रतिनिधी) : वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता आठवी तुकडी (ई) मधील विद्यार्थी श्रीपाद अविनाश माळी याने प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. वर्गात बेंचखाली सापडलेले चार हजार रुपये आणि शालेय साहित्य असलेले पाकीट स्वतःकडे न ठेवता त्याने तत्काळ वर्गशिक्षिका सीमा ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. या प्रामाणिक कृतीमुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून त्याचे विशेष कौतुक करण्यात आले. शुक्रवार, ३ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ वाजता श्रीपाद अविनाश माळी हा विद्यार्थी वर्गात आला. बेंचवर बसल्यानंतर त्याला बेंचखाली एक पाकीट पडलेले दिसले. त्याने तातडीने त्याच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थी पार्थ दीपक पाटील याला याबाबत सांगितले. त्यानंतर श्रीपादने कोणताही मोह न बाळगता ते पाकीट उचलून वर्गशिक्षिका सीमा ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. वर्गशिक्षिका सीमा ठाकूर यांनी पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये तब्बल चार हजार रुपये आणि शालेय साहित्य असल्याचे आढळून आले. एवढ्या लहान वयातही प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या श्रीपादचे त्यांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसमोर कौतुक करून त्याला शाबासकी दिली. ट्युशनची फी भरण्यासाठी आणले होते चार हजार रुपये वर्गशिक्षिका सीमा ठाकूर यांनी हे पाकीट क्रीडा शिक्षक आशिष चौधरी यांच्याकडे सुपूर्द करून त्याच्या मालकाचा शोध घेण्यास सांगितले. चौकशीअंती हे पाकीट एका विद्यार्थ्याचे असल्याचे समोर आले. संबंधित विद्यार्थ्याने ट्युशनची फी भरण्यासाठी हे चार हजार रुपये आणले होते, अशी माहिती मिळाली. त्यानंतर ते पाकीट आणि त्यातील रक्कम संबंधित विद्यार्थ्याला सुरक्षितपणे परत करण्यात आली. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर श्रीपादचे कौतुक श्रीपाद माळी याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केवळ वर्गापुरते मर्यादित राहिले नाही. सायंकाळी शाळा सुटण्यापूर्वी मैदानावर प्रार्थनेच्या वेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर श्रीपादला बोलावण्यात आले. यावेळी शिक्षकांनी त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत इतर विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारची प्रामाणिकता आणि नैतिक मूल्ये जोपासावीत, अशी भावना व्यक्त केली. "श्री समर्थ बैठकीतून मिळाली प्रामाणिकपणाची शिकवण" याबाबत बोलताना विद्यार्थी श्रीपाद अविनाश माळी म्हणाला, "मी श्री समर्थ बैठकीला जातो. तेथे आम्हाला शिकवले जाते की, खाली पडलेली किंवा आपली नसलेली कोणतीही वस्तू उचलू नये. ते पाकीट माझे नव्हते, त्यामुळे मी ते मॅडमकडे दिले." श्रीपाद माळी या विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून, त्याच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


