गोमातेच्या अंतिम संस्कारासाठी डिझेल व चालकाची मागणी; गोरक्षक रोहित महाले यांचा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी) – राज्यमाता म्हणून सन्मान प्राप्त असलेल्या गोमातेच्या अंतिम संस्कारासाठीही नगरपालिका प्रशासनाकडून जेसीबीसाठी डिझेल व चालकाची अपेक्षा ठेवली जात असल्याचा आरोप करत गोरक्षक रोहित महाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याबाबत तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास अन्नपाणी त्यागून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

"गोमातेची सेवा हे आमचे भाग्य आहे. गोमाता ही आमचीच नव्हे, तर सर्वांची आई आहे. तिच्या सेवेकडे व अंतिम संस्काराच्या कार्याकडे दुर्लक्ष होणे कदापी सहन केले जाणार नाही," अशी भावना रोहित महाले यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी सांगितले की, कडक उन्हाळ्याच्या काळात एका दिवसात चार गोमातांचे अंतिम संस्कार करण्याची वेळ आली होती. त्यावेळी गोभक्त नगरसेवक राज चौधरी यांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबीसाठी डिझेल उपलब्ध करून दिले होते. यासंदर्भातील पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राज्यमाता म्हणून सन्मान असलेल्या गोमातेच्या मृत्यूनंतर तिच्या अंतिम संस्कारासाठी सामान्य गोसेवकांकडून आर्थिक अपेक्षा ठेवणे योग्य आहे का, असा प्रश्न शहरातील गोभक्तांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच, गोसेवकांना वारंवार अधिकाऱ्यांकडे विनंती करावी लागते आणि काही अधिकाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

नगरपालिकेकडे शासनाकडून विविध वाहने व जेसीबी मशीन उपलब्ध असतानाही गोमातेच्या अंतिम संस्कारासाठी डिझेल व चालकाची मागणी केली जात असल्याने गोभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. "हे कार्य कोणत्याही व्यक्तीचे नसून देवसेवा आहे. त्यामुळे सेवेकरी बांधवांना मानसिक त्रास देणे अयोग्य आहे," असेही रोहित महाले यांनी म्हटले आहे.

समस्त गोभक्तांची मागणी अशी आहे की, गोमातेच्या रक्षण व सेवेसाठी नगरपालिका प्रशासनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता तत्पर मदत करावी. अन्यथा, गोमातेला साक्षी मानून देशभरातील गोभक्तांच्या माध्यमातून आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गोरक्षक रोहित महाले यांनी दिला आहे.