भुसावळ (प्रतिनिधी)- बदलते हवामान, वाढते तापमान आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता दावत-ए-इस्लामीच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) तर्फे संपूर्ण भारतात “Save Nature” या नावाने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि हरित वातावरणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे हा आहे. या मोहिमेअंतर्गत भुसावळ येथील बी.जे.झेड. उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एम.आय. तेली इंग्लिश स्कूल आणि अल-हिरा उर्दू हायस्कूल येथे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक झाडे लावण्यास, त्यांची निगा राखण्यास आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व हिरवेगार वातावरण निर्माण करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, झाडे केवळ पर्यावरणाचा समतोल राखत नाहीत तर वाढत्या उष्णतेवर नियंत्रण ठेवणे, शुद्ध हवा उपलब्ध करून देणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दावत-ए-इस्लामीच्या शिक्षण विभागाचे मौलाना अब्दुल बारी साहेब इंजिनिअर (नाशिक), मौलाना अहमद रजा साहेब (नागपूर), दावत-ए-इस्लामी जळगाव जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी, भुसावळ शहराध्यक्ष शोएब अत्तारी, साबिर मनिहार, अजहर कादरी तसेच GNRF जळगाव जिल्हाध्यक्ष रफीक रोशन कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण व वृक्षारोपण ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी समजून “सेव्ह नेचर” मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. GNRF तर्फे भविष्यातही विविध शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे



