शिव कॉलनीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; चार बंद घरांवर डल्ला, 70 हजारांची रोकड व 28 ग्रॅम सोने लंपास

भुसावळ (प्रतिनिधी ) - शहरातील पु. ओ. नाहाटा महाविद्यालयाजवळील अत्यंत गजबजलेल्या शिव कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत चार बंद घरांना लक्ष्य केले. यापैकी एका घरातून सुमारे 70 हजार रुपयांची रोकड आणि 28 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले, तर अन्य तीन घरांमध्ये चोरट्यांच्या हाती कोणताही मौल्यवान ऐवज लागला नसल्याची माहिती आहे.

जामनेर रोडवरील शिव कॉलनीत वास्तव्यास असलेले प्रमोद भास्कर भंगाळे हे जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे रिन्यू ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. ते पत्नी मंगला भंगाळे यांच्यासह पंढरपूर दर्शनासाठी गेल्याने त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सुमारे 70 हजार रुपयांची रोकड, पाच ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, तीन ग्रॅमची एक अंगठी तसेच पाच ग्रॅमचा सोन्याचा कॉईन असा एकूण 28 ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरून नेला.

सोमवारी सकाळी भंगाळे यांच्या शेजारील कुटुंबातील सदस्य पेपर घेण्यासाठी त्यांच्या घरासमोर गेले असता कुलूप तुटलेले दिसून आले. घरफोडीचा संशय आल्याने त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच प्रमोद भंगाळे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. घरफोडीची माहिती मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. ते कर्नाटक एक्स्प्रेसने भुसावळात परतल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, भंगाळे यांच्या घराजवळील दुसऱ्या गल्लीतही चोरट्यांनी पंढरीनाथ महादू पाटील, अमोल गिरी आणि सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागातील कर्मचारी अच्युत मायानगरी यांच्या घरांचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र घरात कोणताही मौल्यवान ऐवज नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. घरातील सामान अस्ताव्यस्त करून चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक महेश गायकवाड, डीबी शाखेचे हवालदार विजय नेरकर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.