भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ परिसरातील शेकडो सोलर ग्राहक महावितरणच्या ढिसाळ आणि विस्कळीत कारभारामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलर नेट मीटरिंग योजनेअंतर्गत ग्राहकांनी ग्रीडमध्ये जमा केलेल्या अतिरिक्त विजेच्या "बँक युनिट"ची रक्कम वेळेत ग्राहकांच्या खात्यात जमा करणे महावितरणसाठी बंधनकारक असतानाही मागील दोन महिन्यांपासून अनेक ग्राहकांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. लाखो रुपयांची गुंतवणूक करून सोलर प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांना आता स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी महावितरण कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, हा प्रश्न शासनाच्या सौर धोरणाचा नसून महावितरणच्या अंतर्गत प्रशासनातील त्रुटी, नियोजनाचा अभाव आणि निष्काळजी कार्यपद्धतीचा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. सोलर ग्राहक सुनीलसिंग चौधरी यांनी सांगितले की, "आमचे पैसे महावितरणकडे अडकलेले असताना आम्हालाच वारंवार कार्यालयात जाऊन पाठपुरावा करावा लागतो. प्रत्येक वेळी 'सिस्टम अपडेट सुरू आहे', 'तांत्रिक अडचण आहे', 'प्रक्रिया सुरू आहे' अशीच उत्तरे दिली जातात. दोन महिन्यांपासून ग्राहकांना हेलपाटे मारायला लावणारी ही प्रणाली नेमकी कोणासाठी आहे? ग्राहकांना वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, मात्र जबाबदारी स्वीकारायला कोणीही तयार नाही." ग्राहक अनिल सनांसे यांनी आणखी गंभीर प्रकार उघड करत सांगितले की, "महावितरणकडे आमच्या सोलर बँक युनिटची हजारो रुपयांची रक्कम शिल्लक असताना केवळ १,२०० रुपयांच्या देयकासाठी स्मार्ट मीटरद्वारे कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला. आमच्या कुटुंबाला एक दिवस अंधारात राहावे लागले. एका बाजूला महावितरण ग्राहकांचे पैसे अडकवून ठेवते आणि दुसऱ्या बाजूला स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करते. ग्राहकांसाठी एक आणि स्वतःसाठी दुसरा न्याय, ही दुटप्पी भूमिका आहे." या संपूर्ण प्रकारावर समाजसेवक प्रा. धिरज पाटील यांनी महावितरण प्रशासनाला थेट जाब विचारला आहे. "ही समस्या शासनाच्या सौर ऊर्जा धोरणाची नाही, तर महावितरणच्या अपयशी व्यवस्थापनाची आहे. ग्राहकांचे पैसे वेळेत देण्यात अपयश येते, पण स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज कापण्याची कार्यवाही मात्र क्षणार्धात होते. महावितरणकडे ग्राहकांचे पैसे शिल्लक असताना त्यांनाच थकबाकीदार ठरविण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना कुणी दिला? ग्राहकांची आर्थिक पिळवणूक आणि मानसिक छळ तात्काळ थांबवावा. अन्यथा सोलर ग्राहकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील," असा इशारा त्यांनी दिला. मागील दोन महिन्यांपासून सातत्याने तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ही केवळ तांत्रिक अडचण नसून महावितरणच्या कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटी असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये आहे. आता महावितरण प्रशासन जबाबदारी स्वीकारून ग्राहकांना न्याय देणार की नेहमीप्रमाणे "सिस्टम"च्या नावाखाली वेळकाढूपणा करणार, याकडे भुसावळ परिसराचे लक्ष लागले आहे.


