जीवनात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, सकारात्मक विचार, शिस्त व सतत शिकण्याची वृत्ती असणे आवश्यक – प्रा राजेद्र चिंचोले


भुसावळ ( प्रतिनिधी)- येथील नारीशक्ती व उद्देशीय संस्था रेड स्वस्तिक सोसायटी व प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल यांच्या तर्फे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रोटरी भवन मायादेवी नगर येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी व्याख्याते प्रा राजेंद्र चिंचोले (पाचोरा ) यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की
आजचा हा सोहळा केवळ गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा नसून मेहनत, जिद्द आणि स्वप्नांच्या यशाचा उत्सव आहे. दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. या टप्प्यावर मिळालेले यश हे पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत आधार ठरते.
सर्वप्रथम, उत्कृष्ट यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या यशामागे तुमची मेहनत, पालकांचे कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे. गुण मिळवणे महत्त्वाचे असतेच, पण त्यासोबत चांगले संस्कार, शिस्त आणि समाजाप्रती जबाबदारीही तितकीच आवश्यक आहे.
विद्यार्थी मित्रांनो,
आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त मार्क्स पुरेसे नाहीत. तुमच्याकडे आत्मविश्वास, कौशल्य, सकारात्मक विचार आणि सतत शिकण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. अपयश आले तरी खचून जाऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अनेक महान व्यक्तींनी संघर्षातूनच यश मिळवले आहे.
मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करा. वेळेचे नियोजन करा. दररोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत घ्या. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, उद्योजक किंवा समाजसेवक — कोणतेही क्षेत्र निवडा, पण चांगला माणूस बनणे सर्वात महत्त्वाचे आहे.
पालकांनाही मी सांगू इच्छितो की, मुलांवर अनावश्यक दबाव टाकू नका. प्रत्येक मुलामध्ये वेगळी क्षमता असते. त्यांना समजून घ्या, प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या स्वप्नांना बळ द्या.
आज सत्कार होत असलेले विद्यार्थी इतरांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी मिळवलेले यश हे पुढील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे आणि शिक्षित तरुणाई ही देशाची खरी ताकद आहे.
शेवटी एवढेच सांगू इच्छितो की —
“मोठी स्वप्ने पहा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा; यश नक्की तुमच्या पायाशी येईल.”कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर हे होते तर प्रमुख अतिथी माजी महापौर सीमा भोळे डॉ निलेश चांडक डॉ सतीश पाटील (खगोल अभ्यासक )डॉ धनंजय बेंद्रे डॉ गणेश पाटील हरीत सेना प्रमुख प्रवीण पाटील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्षा मनिषा पाटील ॲड राजेश झाल्टे अविनाश जावळे ज्योती धूत हे उपस्थित होते वरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी सूत्रसंचलन ज्योती राणे यांनी केली विद्यार्थ्यांमधून आर्यन पाटील मोक्षदा लाडवंजारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी …
वंदना मंडावरे एडवोकेट सीमा जाधव नूतन तासखेडकर आशा मौर्य रेणुका हिंगू विद्या जकातदार नेहा जगताप माधुरी शिंपी हर्षा गुजराती संगीता चौधरी शोभा मकवाना स्मिता पाटील तेजल वनरा मंगला खडके यांचे सहकार्य लाभले