राज्यात इंधन संकट गडद; फक्त महिनाभराचा साठा शिल्लक – मंत्री छगन भुजबळ

मुंबई : मध्यपूर्वेत अमेरिका व इस्त्रायलने इराणविरोधात मोर्चेबांधणी केल्याने निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प झाल्यामुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात सध्या केवळ एक महिना पुरेल एवढाच पेट्रोल-डिझेलचा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर राज्याला मोठ्या इंधन संकटाला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

भुजबळ म्हणाले की, “पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत असला तरी राज्याकडे केरोसीनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, रॉकेल वाटपाची जुनी साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी सरकारने विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून केरोसीन वाटपाला विनामूल्य परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.”

दरम्यान, राज्यातील काही भागांत इंधनासाठी नागरिकांमध्ये वाद व हाणामारीचे प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारवर टीकेची झोड उठवली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सुळे म्हणाल्या, “राज्यभरात पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागल्या आहेत. सरकारने फक्त एक महिन्याचा साठा असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतरची परिस्थिती काय असेल याबाबत स्पष्टता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढे येऊन जनतेसमोर स्थिती स्पष्ट करावी.”

छगन भुजबळ यांनी मात्र हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जागतिक संकट असल्याचे सांगितले. “इराण, अमेरिका आणि इतर देशांतील राजकीय तणावामुळे जगभरातील इंधन पुरवठा प्रभावित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या देशांशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.