भुसावळच्या जलशुद्धीकरण केंद्रात धक्कादायक निष्काळजीपणा उघड : दूषित पाणीपुरवठ्यावर प्र.नगराध्यक्षांचा संताप; तातडीने स्वच्छतेचे आदेश

भुसावळ(प्रतिनिधी ) : शहरातील वाढत्या पाणीपुरवठा तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रभारी नगराध्यक्षा आणि भाजप गटनेते यांनी रविवारी नगरसेवकांसह जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देत पाहणी केली. या पाहणीत केंद्रातील अत्यंत धक्कादायक व निष्काळजीपणाचे चित्र समोर आल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

पाहणीदरम्यान जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी वाहून नेणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या चाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले दिसून आले. तसेच केंद्राच्या अंतर्गत भागात कबूतरांसह इतर पक्ष्यांच्या विष्टेमुळे परिसर दूषित झाल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नगराध्यक्षांसह उपस्थित नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

प्रभारी नगराध्यक्षा शैलेजा नारखेडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. तसेच पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

गाळमिश्रित व दूषित पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर

या पाहणीदरम्यान शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक गंभीर बाबी समोर आल्या. सध्या बंधाऱ्यात केवळ आठ दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली. तळातील पाणी उचलावे लागत असल्याने नागरिकांना गाळमिश्रित व दूषित पाणीपुरवठा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातही पाण्याचे पुरेसे शुद्धीकरण होत नसल्याचे चित्र असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाणीपुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत असून 1991 मध्ये 35 कर्मचारी कार्यरत होते, ती संख्या आता केवळ 10 वर आली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यंत अपुरी ठरत आहे. त्यातच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले असल्याने त्यांनी असहकाराची भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

बंधाऱ्यातील गाळसफाई व गळतीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याचेही स्पष्ट झाले.

अतिरिक्त स्टोरेज टँक उभारण्याचा प्रस्ताव

भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी सांगितले की, शहराच्या पाणीपुरवठा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून अतिरिक्त स्टोरेज वॉटर टँक उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येणार आहे. तसेच हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर बंधाऱ्यात जलसाठा वाढेल आणि नागरिकांना दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक राजेंद्र आवटे, किरण कोलते, बबलू बऱ्हाटे, संतोष (दाढी) चौधरी, आशिष पटेल, प्राची पाटील, निकी बत्रा, विशाल नाटकर, आसीफ खान (मक्का), अजय नागराणी, अॅड. बोधराज चौधरी, रूपेश देशमुख, उदय पाटील आदी उपस्थित होते.