लग्नाच्या अवघ्या २० दिवसांत काळाचा घाला !

उष्माघाताच्या संशयाने नवविवाहितेचा मृत्यू; जळगाव जिल्ह्यात हळहळ

चोपडा ( प्रतिनिधी) –

राज्यात वाढत्या उन्हाचा कहर सुरू असताना जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे उष्माघाताच्या संशयाने २० वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वैशाली सुनील मोरे (भील) (वय २०, रा. मोहाडी, ता. जामनेर) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. वैशालीचा विवाह अवघ्या २० दिवसांपूर्वी, २३ एप्रिल रोजी झाला होता. विवाहानंतर ती पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेली होती.

दरम्यान, समारंभाहून परतल्यानंतर अचानक तिला चक्कर येऊन ती कोसळली. तसेच उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने तिला नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत होते. दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिचा मृत्यू झाला.

सध्या जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा तब्बल ४५.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

नुकतेच संसाराला सुरुवात केलेल्या वैशालीच्या आकस्मिक निधनामुळे तिच्या माहेर व सासरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.