भुसावळातील कचरा समस्येवर जय गणेश फाऊंडेशन आक्रमक; “प्रशासन सुस्त, नागरिक जागृत” म्हणत स्वच्छता आंदोलनाचा इशारा ; मुख्याधिकारी यांना निवेदन सादर:

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील वाढत्या कचरा समस्येविरोधात जय गणेश फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेत नगरपालिका प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. शहरातील कचरा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास सोमवारपासून लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचा इशारा संस्थेने दिला आहे.

याबाबत मुख्याधिकारी, भुसावळ नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात शहरातील कचरा व्यवस्थापनाची गंभीर अवस्था मांडण्यात आली आहे. शहरात घंटागाड्या नियमितपणे फिरत नसल्याने अनेक भागांत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचरा उचलण्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठीही नगरपालिकेकडे आर्थिक व्यवस्था नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी दिवसन्‌दिवस कचरा न उचलल्याने नागरिकांकडून तो जाळला जात असून त्यामुळे दुर्गंधी, धूर आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

जय गणेश फाऊंडेशनने यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपत स्मशानभूमी दत्तक घेऊन प्रत्येक रविवारी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. “समाजहितासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहिलो असून शहराच्या प्रश्नांसाठी आजही पुढे येण्यास तयार आहोत,” असे संस्थेने स्पष्ट केले.

दरम्यान, “प्रशासन सुस्त.. पण नागरिक जागृत आहेत!” आणि “स्वच्छ भुसावळसाठी आता जनआंदोलन उभे राहील” अशा घोषणांसह संस्थेने शहर वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.