भुसावळ (प्रतिनिधी )- शहराच्या अनेक भागांत अनियमित व अवेळी, तसेच कमी दाबाने पाणी मिळत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. पुरेसे पाणी वेळेवर मिळावे अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या नेतृत्वात आमिर शेख, प्रशांत तावडे, राज पाटील, गिरीश ठाकरे व रहिवासी यांनी नगरपालिका पाणी पुरवठा अभियंता नितीन लुंगे यांच्याकडे केली आहे. तक्रारीची एक प्रत पाणी पुरवठा व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सुद्धा पाठवली आहे. पुरवठ्याच्या वेळेत सुयोग्य बदल करू व उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळातील सर्व व्हॉल्वमन सोबत बैठकीत हा विषय उपस्थित करू असे आश्वासन नितीन लुंगे यांनी दिले. भुसावळ नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या वाढली असून, शहरी भागात पाण्याची मागणी प्रचंड वाढत आहे. तसेच साकेगाव, खडका या हद्दीतील नागरिकांनासुद्धा नगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा केला जातो.
पालिका व महावितरणमध्ये समन्वयाचा अभाव:
आधीच नगरपालिका आणि पाटबंधारे विभागाचा आपाआपसांत समन्वय कमी असल्याने शहराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्यानेच शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दावा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केला जातो. वादळाआधी व नंतर तर महावितरण आणि नगरपालिका यात समन्वयक झाला नसल्याने पाणीपुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल झाला अन नळाच्या पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. गत दोन आठवड्यांपासून शहरात अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने घरातील जेष्ठ नागरिक व महिलांची धांदल उडाली अशी तक्रार प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे.
पाण्यामुळे दिनक्रमच बदलला:
शहरात अनेक ठिकाणी रात्री अपरात्री पुरवठा होतो. जळगाव रोड परीसरात सकाळी तीनच्या आसपास तर जामनेर रोड परीसरात रात्री बाराच्या पुढे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास उशीर होतो. अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना तासन्तास घरी बसावे लागते. परंतु पालिका प्रशासनाकडून पाणी वितरण करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
कमी पाणी आलेल्या भागातील नागरिकांना पिण्याऐवढेही पाणी मिळत नाही. तर अधिक प्रमाणात पाणी सुटणाऱ्या भागातील पाणी रस्त्याने वाहून जाते. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रा.धिरज पाटील यांनी केले आहे



