भुसावळ (प्रतिनिधी) –
नुकतीच देशभर नीट (NEET) परीक्षा संपन्न झाली. मात्र, या परीक्षेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरक्षेच्या नावाखाली हिंदू परीक्षार्थींच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर, केवळ नीटच नव्हे तर JEE आणि भारतातील सर्व केंद्र व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये हिंदू बांधवांना सन्मानाची वागणूक आणि न्याय मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते . शिशिर जावळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागणार आहे.

परीक्षेच्या नावाखाली अघोरी सक्ती
नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेदरम्यान विविध परीक्षा केंद्रांवर तपासणीच्या नावाखाली हिंदू विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल करण्यात आले. परीक्षार्थींना त्यांचे मनगटी घड्याळ, गंडा-दोरा, गळ्यातील तुळशीमाळा, रुद्राक्ष आणि स्फटिक माळा परीक्षा केंद्राबाहेर उतरवण्यास भाग पाडले गेले. महिला आणि विद्यार्थिनींच्या बाबतीत तर हे निर्बंध अधिकच कठोर होते; त्यांचे सौभाग्यलेणी असलेले मंगळसूत्र, कानातील डूल आणि कपाळावरील कुंकू-टिकली सुद्धा काढण्याची सक्ती करण्यात आली. इतकेच नाही तर अमानवीय पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शर्टच्या फुल बाह्या कापण्यात आल्या आणि पॅन्टची बटणे सुद्धा तोडण्यात आली.
विशिष्ट धर्मीयांना सूट, हिंदूंनाच टार्गेट?
शिशिर जावळे यांनी या प्रक्रियेतील भेदभावावर तीव्र आक्षेप घेतला आहे. भारतातील अनेक राज्यांमधून अशा बातम्या समोर आल्या आहेत की, जिथे विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या धार्मिक पेहरावासह कोणत्याही कडक तपासणीशिवाय प्रवेश दिला गेला. मात्र, प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त हिंदू विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महिला भगिनींनाच टार्गेट केले जाते. “हिंदू वैदिक धर्मानुसार महिलांना त्यांचे आभूषण, कुंकू आणि भाविकांना तुळशीमाळा किंवा रुद्राक्ष धारण करणे अनिवार्य आहे. हे उतरवण्यास भाग पाडणे हे हिंदू धर्माच्या दृष्टीने पाप आहे,” असे जावळे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
देशव्यापी ‘समान न्याय’ हवा
शिशिर जावळे यांनी मागणी केली आहे की, ही समस्या केवळ नीट पुरती मर्यादित नाही. केंद्र स्तरावरील JEE, NEET सह भारतातील प्रत्येक राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारची सक्ती केली जाते. या सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक आहेच, परंतु ती पारदर्शकता केवळ हिंदूंच्या धार्मिक प्रतीकांवर घाला घालूनच का येते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधानांकडे केलेल्या प्रमुख मागण्या:
धार्मिक चिन्हांचा सन्मान: हिंदू धर्माशी संबंधित तुळशीमाळा, रुद्राक्ष, कडा, कलावा आणि गंध-तिलक यांना परीक्षेसाठी सक्तीने काढण्यात येऊ नये.
महिलांच्या सन्मानाची जपणूक: हिंदू महिलांचे मंगळसूत्र आणि टिकली , जोडवे ही केवळ आभूषणे नसून ती धार्मिक श्रद्धा आहेत, त्यावर बंदी नसावी.
भेदभावमुक्त नियमावली: केंद्र आणि राज्य स्तरावरील सर्व परीक्षांसाठी नियम समान असावेत; विशिष्ट धर्माला सूट आणि हिंदूंवर सक्ती हे प्रकार त्वरित थांबवावेत.
आधुनिक तपासणी यंत्रणा: कपडे कापण्यासारख्या अश्लाघ्य प्रकारांऐवजी आधुनिक स्कॅनिंगचा वापर करून पारदर्शकता राखावी.
“आपल्या परीक्षा पद्धतीत शिस्त हवीच, पण ती केवळ एकाच धर्माच्या वाट्याला येता कामा नये. भारतातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेत हिंदू बांधवांना त्यांच्या धर्माचा आणि परंपरेचा सन्मान राखत परीक्षेस बसता यावे, हीच आमची मागणी असून याबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर कळविलेले आहे याबाबत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री शिक्षण विभाग भारत सरकार यांच्याकडे तक्रार सुद्धा केली असल्याचे त्यांनी कळविलेले आहे.


