सप्तशृंगी गडावर खळबळजनक प्रकार! मंदिरातील तब्बल २२ किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण…!

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडावरील मंदिरातून येथून तब्बल २२ किलो चांदी गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मंदिर ट्रस्टच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

नाशिकमधील सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारातून मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये तब्बल २२ किलोपेक्षा अधिक तफावत आढळून आली आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी पुराव्यानिशी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जुन्या नोंदीनुसार मंदिरात ४०६ किलो चांदी वापरण्यात आल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्ष मोजणीमध्ये केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुमारे २२ किलो ४९० ग्रॅम चांदी गायब झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच हा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवण्यात आला आहे.

ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदी काढताना आवश्यक असलेली पंचनामा, अधिकृत वजन आणि सीलबंद प्रक्रिया नियमांनुसार पार पडली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा केवळ तांत्रिक घोळ नसून नियोजित अपहार असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

या प्रकरणी जानेवारी २०२६ पासून स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलनही छेडले होते. मात्र दीर्घकाळ कारवाई न झाल्याने अखेर प्रकरण राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात पोहोचले. त्यानंतर प्रशासनाने हालचाल करत चौकशीला गती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मंदिर ट्रस्टच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासात नेमके काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.