“हा पूर्णपणे बेकायदेशीर प्रकार असून “ही गुंडगिरी सहन केली जाणार नाही” गटनेते युवराज लोणारी

भुसावळ (प्रतिनिधी) -: नगरपालिकेची सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावर भाजपकडून तीव्र आक्षेप घेत “हा पूर्णपणे बेकायदेशीर प्रकार आहे,” असा आरोप गटनेते युवराज लोणारी यांनी केला.

बुधवार १८रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना युवराज लोणारी म्हणाले की, सभा एकदा तहकूब केल्यानंतर ती पुन्हा सुरू करताना सर्व नगरसेवकांना विश्वासात घेणे आणि किमान १० ते १५ मिनिटांचा अवधी देणे आवश्यक असतो. मात्र, कोणतीही प्रक्रिया न पाळता आम्ही मुद्दे मांडत असतानाच काही मिनिटांतच, नगरसेवक संतोष चौधरी यांच्या सांगण्यावरून सभा तहकूब करण्यात आली. “हा प्रकार लोकशाहीचा अपमान आहे,” अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. भाजप नगरसेविकांवर धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करत, “ही गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करणार,” असा इशाराही लोणारी यांनी दिला.

नगरसेवक किरण कोलते यांनी प्रशासनावर टीका करत, “कामे करायची असतील तर नियमांनुसार करा. विकासासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत,” असे स्पष्ट केले. तर नगरसेविका सोनल महाजन यांनी वारंवार सभा बोलावून त्या तहकूब केल्या जात असल्याने विकासकामे ठप्प होत असल्याची नाराजी व्यक्त केली.

सभेदरम्यान पत्रकारांना बाहेर काढल्याचा मुद्दाही चांगलाच गाजला. “पत्रकारांना बाहेर काढणे नियमबाह्य असून, जनतेपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न आहे. नगराध्यक्षा स्वतःच्या निर्णयावर ठाम नसून इतरांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत,” असा आरोपही लोणारी यांनी केला.

या सर्व प्रकारामुळे भुसावळ नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.