जळगाव : एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय जंगल परिसरात आढळून आलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाच्या खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) यास अटक करण्यात आली आहे.

दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पद्मालय वनपरिक्षेत्रात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा व छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१) व २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घनदाट जंगल व निर्जन परिसरामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. मात्र मृत महिलेच्या पायाच्या नखांवरील मॅजंटा रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकातील सोन्याची ‘मुर्नी’ हे ओळखीचे महत्त्वाचे धागे ठरले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून मृत्यूचा कालावधी ३० किंवा ३१ जानेवारी असल्याचे स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती, तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. छत्तीसगढ येथील रहिवासी असलेल्या मृत महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. वैयक्तिक वादातून रागाच्या भरात डोक्यात प्रहार करून व ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलमधील पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे तसेच इतर अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



