भुसावळ नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शैलजा नारखेडे; भाजपचा दणदणीत विजय

भुसावळ (, प्रतीनिधीत )दि. १५ जानेवारी २०२६ :
भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपने एकजुटीचे प्रदर्शन करत विरोधकांना मोठा धक्का दिला असून, नगरपरिषदेतील सत्ता समीकरणात भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.

उपनगराध्यक्षपदासाठीची निवडणूक उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली. नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे या पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या, तर मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सभागृहात उपस्थित होते.

भाजपकडून सुरुवातीला दोन उमेदवारांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यामध्ये सौ. प्रिया बोधराज चौधरी आणि सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांचा समावेश होता. भाजपचे सूचक म्हणून नगरसेवक युवराज लोणारी तर अनुमोदक म्हणून राजेंद्र आवटे होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्याकडून सौ. सुनिता कृष्णधन कर यांचा प्रस्ताव मांडण्यात आला.

प्रस्ताव सादर झाल्यानंतर देण्यात आलेल्या १५ मिनिटांच्या माघार कालावधीत भाजपच्या सौ. प्रिया बोधराज चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपकडून सौ. शैलजा नारखेडे या एकमेव उमेदवार राहिल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे गटनेते सचिन संतोष चौधरी यांनी गुप्त मतदानाची मागणी केली होती. मात्र, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी कायद्यातील बदल 8 हे स्पष्ट करत उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी हात उंचावून मतदानाचीच पद्धत लागू असल्याचे सांगून ही मागणी फेटाळली.

मतदान प्रक्रियेनंतर निकाल जाहीर करण्यात आला. सौ. सुनिता कृष्णधन कर यांना नगराध्यक्षा आणि इतर नगरसेवक मिळून एकूण १५ मते (हात) मिळाले, तर भाजपच्या सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांना तब्बल ३२ मते मिळाली. या स्पष्ट बहुमताच्या जोरावर सौ. शैलजा नारखेडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

शैलजा नारखेडे व त्यांचे पती माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे हे गेल्या तीस वर्षांपासून प्रभाग क्रमांक २१ मधून सातत्याने जनसेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल आणि नागरिकांशी असलेली जवळीक याचेच प्रतिबिंब या विजयातून दिसून येते.

या निवडणुकीत अपक्ष आसिफ खान (मक्का), काँग्रेसचे रोहन सूर्यवंशी, काजल मोरे तसेच अपक्ष मानवी आहुजा हे चार नगरसेवक तटस्थ राहिले.

भाजपने दाखवलेली संघटनात्मक ताकद आणि प्रभावी रणनीती यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून, भुसावळ नगरपरिषदेत भाजपची राजकीय स्थिती अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.