जलस्त्राेतांचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी ; किन्ही येथे रासेयाेच्या शिबिरात पाणलाेट तज्ज्ञ विजय काेळी यांचे मत

भुसावळ (प्रतिनिधी) -: पाणी वाचवणे, मातीची धूप थांबवणे, पर्यावरणाचा समताेल राखणे, जलस्त्राेतांचे संरक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शेतीशिवारात पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी पाणलाेट विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी गावागावातील युवक-युवतींनी सजग राहणे अपेक्षित आहे, असे मत पाडळसे येथील पाणलाेट तज्ज्ञ विजय काेळी यांनी किन्ही येथे व्यक्त केले.
भुसावळ येथील काेटेचा महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे द्वितीय स्तराचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर किन्ही येथे आयाेजित करण्यात आले आहे. त्यात ‘हसत खेळत पाणलाेट शिकू या’ या विषयावर मार्गदर्शन करताना विजय काेळी हे बाेलत हाेते. त्यांनी पाणी वाचवा या खेळातून पाण्याची बचत कशी करावी हे कृतीतून सांगितले. पाणलाेट साखळी या खेळ प्रकारात त्यांनी ढगांपासून पाऊस, नदी, विहीर आणि शेतीपर्यंतचा पाण्याचा प्रवास कसा हाेताे हे शिबिरार्थी विद्यार्थिनींना समजावून सांगितले. पाणलोट, पाऊस, झाडे यावर आधारित सोप्या कविता किंवा गाणी त्यांनी म्हटली. जल, जंगल, जमीन यांचे सृष्टीचक्रातील महत्त्व आणि मानवाचा वाढता हस्तक्षेप हा विषय त्यांनी अतिशय साेप्या पद्धतीने समजावून सांगितला. आई-वडिलांचा आदर, आयुष्यातील श्रम आणि शिस्तीचे महत्व तसेच सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी हे मुद्देही त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयंसेविका दीक्षिता सोनवणे होती. स्वागत गीत तनिषा बाऱ्हे, वैष्णवी सोनवणे व रिया सावळे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया सावळेने तर आभार प्रदर्शन तनिषा बाऱ्हे यांनी केले.

समाजमाध्यमे गरजेपुरता वापरा

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पाऊल सजगतेने टाकणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांचा वापर करताना त्याचे धाेके लक्षात घेतले पाहिजे. आपली व्यक्तीगत माहिती जगजाहीर करू नये. कारण या माहितीचा गैरवापर हाेऊ शकताे. शिक्षण जाेपर्यंत पूर्ण हाेत नाही ताेपर्यंत या माध्यमाचा गरजेपुरता वापर करावा. शैक्षणिक वाटचाल करताना आपण जे ध्येय निश्चित केले आहे ते गाठण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे. शिक्षणाचा उपयाेग निसर्गसंपदा जतन करण्यासाठी कसा हाेईल याचाही विचार करावा, असा सल्लाही पाणलाेट तज्ज्ञ काेळी यांनी दिला.

आज पालक सहविचार सभा

राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या विशेष हिवाळी शिबिरात मंगळवारी पालक सहविचार सभा दुपारी ४ वाजता आयाेजित करण्यात आली. किन्ही येथील सर्वाेदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ही सभा झाली. काेटेचा महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डाॅ. जीवन धांडे यांच्या मार्गदर्शनात कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. वसंत खरे, राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एच. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्वेता नागला यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.