कॉपी पकडल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द -प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही आणि कलम 144 लागू

दहावी आणि बारावीच्या आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. परीक्षा केंद्रात कॉपी चालल्यास त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाईल, असा इशारा मंडळाने दिला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि केंद्र परिसरात कलम 144 लागू करणे बंधनकारक असेल, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय
कॉपीमुक्त अभियानांतर्गत मंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक राहील आणि त्याचे रेकॉर्डिंग 30 दिवस जतन केले जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे सतत नजर ठेवली जाणार असून, परीक्षा काळात केंद्र परिसरात कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कलम 144 लागू राहील. परीक्षेपूर्वी म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून सर्व परीक्षा केंद्रांची पडताळणी सुरू करण्याच्या सूचना केल्या आहे, ज्या केंद्रांवर पक्की संरक्षक भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील, त्यांची मान्यता तत्काळ रद्द केली जाईल. असेही नमूद केले आहे.

पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले की,कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे. ज्या केंद्रांवर आवश्यक सुविधा नाहीत, त्या केंद्रांना परवानगी दिली जाणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. या आदेशामुळे राज्यातील सर्व परीक्षा केंद्र संचालकांमध्ये हालचाल सुरू झाली आहे. शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाला आता अधिक बळकटी मिळणार आहे.