भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड-१९ विरूद्धच्या अखंड लढाईत मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात २८३ टन वैद्यकीय वस्तूंची वाहतूक केली. देशभरातील लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे प्राथमिकतेने वैद्यकीय वस्तूंची अखंड वाहतुक सुनिश्चित करत आहे. वेळापत्रकानुसार १८० पार्सल गाड्या यापूर्वीच चालवण्यात आल्या आहेत आणि ४० गाड्या नियोजित आहेत. या पार्सल गाड्यांमधून मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून २०२९ टनांहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली असून त्यामध्ये लॉकडाऊन दरम्यान २८३.५ टन अत्यावश्यक औषधे व इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. यात फळ, भाज्या इत्यादी ९७० टन नाशवंत वस्तूंचा देखील समावेश आहे.
औषधे पोहचवण्यासाठी इतर रेल्वेबरोबर समन्वय साधला जात आहे.
रुग्णांना तातडीची औषधे, उंटांचे दूध पाठविण्याकरिता इतर रेल्वेबरोबर मध्य रेल्वे समन्वय साधत आहे. नुकताच सिकंदराबाद येथील एका मुलाला विशेष उपचारासाठी उंटाच्या दुधाची गरज भासली. ती फलना येथून वांद्रे टर्मिनस, सीएसएमटी मार्गे सिकंदराबाद येथे २८ तासांत पोहचविण्यात आली.
वेगवान विचारानुरूप कार्याच्या आणखी एका घटनेत पार्सल कार्यालयाने हृदयरोग्यासाठी औषधाचे पार्सल घेतले आणि मुंबईतील विक्रोळी ते चिपळूणसाठी ओखा-एर्नाकुलम या पार्सल ट्रेनमध्ये बुक केले. चिपळूण येथे गाडी थांबत नसली तरी कर्मचार्यांनी कोकण रेल्वेशी समन्वय साधून पार्सल देण्यासाठी थांबा द्यावा अशी विनंती केली, यानंतर हे औषधाचे पार्सल चिपळूण येथे स्टेशन मास्टर यांच्याकडे देण्यात आल्याचे जनसंपर्क विभाग मुंबई यांनी प्रसिद्धि पत्रकान्वये कळविले आहे .



