जळगाव : मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, जेष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील(जळगाव) यांचे स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. सन २०२५ साठी देण्यात येतात येणाऱ्या वाडःमय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून पुरस्कार वितरण शनिवारी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुप्रसिध्द साहित्यिक भारत सासणे यांचे शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. अध्यक्षस्थान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी हे भूषवणार आहेत. विनोद शिरसाठ ( संपादक, साधना) व वि.दा.पिंगळे( कार्यवाह, मसाप) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील हे साक्षेपी समीक्षक व सर्जनशील साहित्यिक होते. मराठी साहित्य व संशोधन क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या या योगदानाला स्मरुण प्राचार्य किसन पाटील सरांच्या विद्यार्थ्यांकडून ज्ञानपरंपरा स्थापन करून दरवर्षी वाडःमय पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा पाचोरा – जामनेरतर्फे पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. दर वर्षी आलटून पालटून एका वाडःमय प्रकारासाठी हे पुरस्कार दिले जातात. मराठी वाड्मय क्षेत्रात अत्यंत मानाचे हे पुरस्कार समजले जातात. किसनराव पाटील वाड्मय पुरस्कारांच्या घोषणेकडे साहित्य विश्वाचे लक्ष लागून असते. दरवर्षी यथोचित समारंभात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.
ह्या वर्षीच्या पुरस्कारांसाठी सन २०२४मध्ये प्रकाशित झालेल्या समीक्षा या वाड़्:मप्रकारांचा पुरस्कारांसाठी विचार करण्यात आला होता. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह व शाल, श्रीफळ असे आहे. त्यासाठी नांदेड येथील सुप्रसिध्द बालसाहित्यक व ख्यातकीर्त सिद्धहस्त लेखक, समीक्षक , व्यासंगी अभ्यासक डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘बालसाहित्यातील नवे काही ‘ या समीक्षा ग्रंथाची तर डॉ. अनंता सूर (यवतमाळ) यांच्या ‘साहित्य समाज आणि विचारधारा ‘ या समीक्षा ग्रंथांची विभागून निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दोन्ही साहित्यिकांना विभागून दिला जाणार आहे तर खानदेश स्तरीय पुरस्कार जळगाव येथील साक्षेपी समीक्षक व बहिणाबाईच्या काव्याचे चिकित्सक अभ्यासक डॉ . प्रकाश सपकाळे यांच्या ‘समीक्षा विवेक’ या ग्रंथासाठी’आणि साक्री येथील अभ्यासक डॉ.नरेद्र बापूजी खैरनार यांच्या ‘मंचीय कवितेचा स्वरूपशोध’ या ग्रंथांना विभागून जाहीर झाला आहे. पाच हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे खानदेश स्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे. वरील दोघा सारस्वतांना तो विभागून देण्यात येईल.
अवघ्या काही दिवसातच मराठी वाडःमय क्षेत्रात या पुरस्काराने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.सन 2021 पासून हे पुरस्कार दिले जातात. 2021 साली कथा: मनोहर सोनवणे(पुणे), युवराज पवार , 2022 साली कविता: पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी(नंदूरबार), ऊषा हिंगोणेकर (जळगाव) आणि 2023 ,साली कादंबरी: ज्ञानेश्वर जाधवर(पुणे), विलास मोरे (एरंडोल) , 2024 सारी वीरभद्र मिरेवाड(नांदेड) व प्रशांत असणारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव), सौ. नीता शेंडे ( पाचोरा) यांना बालसाहित्य या वाड:मय प्रकारांसाठी हे पुरस्कार दिले गेले. 2025 या वर्षीच्या पुरस्कारांसाठी समीक्षा हा साहित्य प्रकार आमंत्रीत होता. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा- जामनेर यांचे वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभास उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, पाचोरा शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.वासुदेव वले व प्राचार्य डॉ.किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॅा. अशोक कौतिक कोळी यांनी केले आहे.



