.

साकळी (प्रतिनिधी )-
साकळी ता. यावल येथील शारदा विद्या मंदिराच्या सन १९९६- ९७ मध्ये दहावीच्या बॅचचा स्नेहभेट कार्यक्रम सोमवारी (दि. ४) पार पडला. तब्बल २७ वर्षांनी एकत्र आलेल्या ८५ मित्र – मैत्रिणींनी विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला. अंत्यत नियोजनबध्द सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या भाग्यविधाता असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्मृ़तीचिन्ह स्वरुपातील मानपत्र व सरस्वतीची रजत प्रतिमा देवून कृतज्ञता व्यक्त केली. शारदा विद्या मंदिराच्या प्रांगणात झालेला हा स्नेहभेट सोहळा रंगतदार ठरला. राज्यभरात विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे सक्तीचे करण्यात आले आहेत. सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची ही गरज ओळखून विद्यार्थ्यांनी शाळेला ८ सीसीटिव्ही कॅमेरे भेट दिले.
स्नेहभेट सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.एस . महाजन, एस. बी. अडकमोल, वाय. एस. सोनवणे, पी. एस. जोशी, जी. पी. बोरसे. मुख्याध्यापक आर. जे. माळी, विजयकुमार भावे, एम. आर. पाटील, ए.बी. पाटील, पी. के. बिरारी, एस. जे. पवार, उपशिक्षिका कुसुम पाटील, रजनी फेगडे, जाऊबाई सुरळकर आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९९७ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यानी कृतज्ञता सन्मानपत्र (लखोटा) व सरस्वतीची रजत प्रतिमारुपी सन्मानचित्र देवून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन कोअर कमेटीचे सदस्य नरेंद्रकुमार चौधरी यांनी केले. विद्यार्थीनींनी स्वागत गित सादर करुन शालेय स्मृतींना उजाळा दिला. प्रिती पाटील यांनी सर्व शिक्षकांचा नामोल्लेख असलेली कविता सादर केली. स्नेहभेट सोहळ्याच्या आयोजन समितीमधील नरेंद्रकुमार चौधरी, चंद्रपाल धाकडे, अरविंद्र निळे, रमाकांत पाटील, देविदास बडगुजर, प्रिती पाटील, रुपाली महाजन, वैशाली बडगुजर यांनी या कार्यक्रमासाठी सलग तीन महिन्यांपासून व्यापक नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी केला. यानिमित्ताने सर्व मित्रांनी आयोजन समितीचे आभार मानले. यावेळी शारदा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कै. वसंतराव महाजन यांच्यासह मृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मृत विद्यार्थ्यांच्या पवित्र आत्म्यास श्रध्दांजली अर्पण करुन त्यांचे स्मरण करण करण्यात आले. साकळी गावात आजपर्यंत झाला नाही, असा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहभेट कार्यक्रम पार पडला, अशा भावनाही यावेळी शिक्षकांनी व्यक्त केल्या. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना निरामय निरोगी दिर्घायुष्य मिळावे, यासाठी सदीच्छा दिल्या.
मृत मित्रांच्या कुटूंबाला मदतीचा हात
१९९६-९७ च्या बॅचमधील दोन मित्रांचा गेल्या काळात दुर्देवी मृत्यू झाला. कै. रघूनाथ बडगुजर व कै. गलीराम बाविस्कर यांच्या आठवणींनाही उजाळा देवून मित्रांनी जमवलेल्या रक्कमेतून दोघांच्या कुटूंबांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची आर्थिक घरपोच मदत देण्यात आली. यासोबतच त्यांच्या मुलांना आगामी काळात शिक्षणासाठी कोणत्याही स्वरुपाची अडचणी आल्यास मदतीचे आश्वासन दिले. अल्प का असेना ही मदत निखळ मैत्री जोपासणारी ठरली.
—- —
आपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करा
माजी मुख्याध्यापक, उपशिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यांनी १९९६-९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले. शासकिय सेवेपासून शेतकऱ्यापर्यंत सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपला नावलौकीक केला आहे. आगामी काळातही आपल्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करुन शाळेचे व गावाचे नाव उज्वल करावे, असे मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, अहमदाबाद, बऱ्हाणपूर आदींसह मोठ्या शहरांमध्ये स्थायीक झालेल्या सर्व मित्रांनी आवर्जून हजेरी लावली.
—
फोटो ओळी – शारदा विद्या मंदिरात स्नेहमिलन प्रसंगी उपस्थित शिक्षकांसोबत १९९६-९७ च्या दहावी बॅचचे विद्यार्थी.


