वरणगाव शहरातील गुंडागर्दी मोडीत काढणार – सपोनि भरत चौधरी :

वरणगांव –
शहर व परिसरातील गुंडागर्दी व टवाळखोरी मोडीत काढणार असुन सर्वसामान्य नागरिकांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असा वरणगांव पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचीत सपोनि भरत चौधरी यांनी गुंडागर्दी करणाऱ्यांना इशारा दिला .

वरणगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांची महिनाभरापासून बदली होणार असल्याची चर्चा सुरू असतानांच रावेर येथे बदली झाल्याचे आदेश मंगळवारी रात्री अचानक प्राप्त झाले . यामुळे त्यांच्या जागेवर जळगांव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . नियुक्ती होताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये त्यांनी बुधवारी सकाळीच सहायक पोलिस निरीक्षक आडसुळ यांचेकडून पदभार स्वीकारला . सपोनि भरत चौधरी यांनी २०१२ मध्ये युपीएससीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस प्रशासनात नोकरीचा पदभार स्वीकारला असून त्यांनी अद्यापपर्यंत मुंबई, गडचिरोली जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावले आहे . गडचिरोली जिल्ह्यात असतांना त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यांना पोलीस प्रशासनातर्फे दोन वेळा सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले आहे . यानंतर त्यांची काही महिन्यांसाठी जळगांव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती . आता त्यांच्याकडे वरणगांव पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आल्याने त्यांची भेट घेतली असता त्यांचेशी वार्तालाप करताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष करुन या पोलीस ठाण्यात माझी नियुक्ती केली आहे . यामुळे शहर व परिसरातील शांतता कायम रहावी यासाठी प्रथम शहरातील गुंडागर्दी व टवाळखोरी मोडीत काढली जाईल . तसेच वर्दी हिच माझी जात असल्याने पोलिसांच्या वर्दीचा कुणी अपमान केल्यास ती व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असलीतरी त्याचेवर कुठल्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर कारवाई केली जाईल . या शिवाय पोलीस ठाण्याच्या माध्यमातुन कुठल्याही प्रकारे सर्वसाधारण नागरीकावर अन्याय केला जाणार नाही . इतकेच नव्हेतर महिला व शालेय विद्यार्थींनीच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाणार असून त्यांच्या मध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल असे कार्य केले जाईल . तसेच सर्वसाधारण नागरीकांना काही त्रास असल्यास त्यांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता थेट माझेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असुन यासाठी माझा भ्रमणध्वनी सर्वसाधारण नागरीकांसाठी २४ तास सक्रीय राहील असे सांगीतले .