मध्य रेल्वेने २.७५ लाख टन फळे आणि भाजीपाला भारतभर किसान रेल्वेद्वारे वाहतूक केली

मध्य रेल्वेने दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सांगोला ते मुझफ्फरपूर हि ८००वी किसान रेल चालवली.
जलद वाहतूक, ५०% अनुदानासह, शेतमालासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून, किसान रेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धी, आनंद आणि आशा घेऊन आली आहे. पहिली किसान रेल सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या ८०० फेऱ्यांमधून २,७५,७६१ टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे.
मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेने आपल्या ८००व्या फेरीत २०७ टन फळे, भाजीपाला जसे की पपई, डाळिंब, केळी, भारतीय मनुका (बेर), आले, कांदा इत्यादी सांगोला, दौंड आणि येवला येथून बिहार राज्यातील दानापूर, मुझफ्फरपूर येथे नेले.
दि. ७.८.२०२० रोजी पहिली किसान रेल आणि दि. २८.१२.२०२० रोजी किसान रेलची
१००वी फेरी चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता ज्याला माननीय पंतप्रधानांनी वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. किसान रेलची ५००वी फेरी दि. १२.८.२०२१ रोजी चालली. आता, किसान रेलची ८००वी फेरी दि. २८.११.२०२१ रोजी सांगोला ते मुझफ्फरपूर करीता निघाली.
सोलापूर विभागातील डाळिंब, द्राक्षे, लिंबू, सिमला मिरची, कस्तुरी खरबूज, पेरू, सिताफळ, बेर (भारतीय मनुका), लातूर आणि उस्मानाबाद विभागातील फुले, अहमदनगर आणि नाशिक विभागातील कांदा, सोलापूर जिल्ह्यातील तसेच भुसावळ आणि जळगाव विभागातील केळी, नागपूर विभागातून संत्री आणि इतर फळे व भाजीपाला दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल सारख्या दूरच्या बाजारपेठेत जलद आणि ताजी राहतील अशा पद्धतीने किसान रेलद्वारे पाठविल्याने त्यांच्या मालाला चांगला भाव, जलद वाहतूक, किमान माल वाया जाते व मोठ्या बाजारपेठांसह चांगला महसूल मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.
श्री अनिल कुमार लाहोटी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले की, किसान रेल्वेच्या ८०० फेऱ्या जलद आणि सुरक्षित वाहतूक आणि नवीन मोठ्या बाजारपेठांमधील प्रवेशासह शेतकऱ्यांना त्याचे प्रचंड फायदे स्पष्ट करतात.
मध्य रेल्वे सध्या ७ अनुसूचित किसान रेल चालवते. देवळाली -मुझफ्फरपूर, सांगोला -मुझफ्फरपूर, सांगोला -आदर्श नगर दिल्ली, सांगोला -शालीमार, रावेर -आदर्श नगर दिल्ली, सावदा -आदर्श नगर दिल्ली आणि गोधनी -आदर्श नगर दिल्ली आणि या अनुसूचित किसान रेल व्यतिरिक्त अनेक अनशेड्यूल किसान रेल चालवण्यात येत आहेत.


