. वरणगांव – तालुक्यातील फुलगांव या गावाचा पाणीपुरवठा बील न भरल्या मुळे मागच्या पंधरा दिवसापासुन बंद आहे . त्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्यामुळे फुलगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालया सह सरपंचाच्या घरी मोर्चा नेऊन पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली .
फुलगावचा पाणीपुरवठा हा सामुहिक पाणीपुरवठा योजनेद्वारा करण्यात येतो . त्यामध्ये फुलगाव, अंजनसोंडे, कठोरा खु,कठोरा बु, अशा चार गावांना पाणीपुरवठा केला जातो . परंतु ग्रामपंचायतीचे योग्य नियोजना अभावी व थकलेल्या विज बिलामुळे दर दोन महीन्यांनी पाणीपुरवठा कट केला जातो .
जवळजवळ 12/11/2021 पासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यासाठी गावातील महिलांसह पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता .परंतु तेथे सरपंच, उपसरपंच सत्ताधारी सदस्य उपस्थित नसल्यामुळे शेवटी सरपंचाच्या दारी मोर्चा नेण्यात आला .सहा वर्षापासुन विजेची अशीच परिस्थिती असुन जवळ जवळ ८३ लक्ष ८६ हजार रुपयांपर्यंत थकबाकी असल्यामुळे दर दोन महिन्यांनी विजपुरवठा खंडीत होत असुन फुलगांवकरांना पाण्यासाठी लढा द्यावा लागत आहे . तरी संबंधितांनी याकडे लक्ष्य देवून ग्रामस्थांची पाण्याची समस्या कायमसाठी मार्गी लावण्याची मागणी केली आहे .
दरम्यान उपसरपंच राजकुमार चौधरी म्हणाले पाणीपुरवठा करण्यासाठीच्या संपूर्ण यंत्रणेचा खर्च व ग्रामस्थांकडून पाणीपट्टी वसुलीची रक्कम यामध्ये भरपुर तफावत आहे . सुरुवातीला संपूर्ण योजना जिल्हा परिषदेमार्फत राब विली जात होती .परंतु जि प ने हि जबाबदारी ग्रामपंचायतीकडे लादण्याचा घाट घातला असुन सध्या आकारण्यात येणाऱ्या १०००रु . पाणीपट्टीच्या जागी ४५००रु . पाणीपट्टी घ्यावी . अशी सुचना केली आहे . ती आम्ही चारही गावे मिळून फेटाळली आहे . त्यावर लवकरच तोडगा काढून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत . सध्या चालु बिल भरून विजपुरवठा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगीतले . ग्रामसेवक यांचेशी संपर्क केला असता मोबाईल स्विच ऑफ होता .



