भुसावळ (प्रतिनिधी )-
बाजारपेठ पोलीस स्टेशन ते नाहटा चौफुली दरम्यान रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. आधीच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पथदिवे बंद असताना येथून वाहतूक करणे जिकिरीचे होते, जनतेवर अंधारात चाचपडत मार्ग काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तरी येथील पथदिवे सुरू करावेत कारण पथदिवे केवळ शोभेचा ठरत आहे़ त्यामुळे येथील रहिवाशांना तब्बल चार वर्षापासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. नपा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवावी व नागरिकांच्या जिवाशी होणारा खेळ कुठेतरी थांबवावा तसेच वेळेत दुरुस्ती न करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकून दंड वसूल करावा अश्या मागणीचे निवेदन भुसावळ दक्षिण विभाग शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपालिका प्रशासनास देण्यात आले. शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. प्रसंगी माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, महिला आघाडीच्या तालुका संघटिका भुराताई चव्हाण, युवा सेना शहरप्रमुख सुरज पाटील, उपशहर प्रमुख नबी पटेल, विक्की चव्हाण, भारती गोसावी, छाया बोंडे उपस्थित होते.
खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मिनी हायमाँस्ट पोल बसवीण्यात आले आहे, मात्र त्यांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. अनेक पथदिवे फुटले असून अनेक खांबही गायब झाले आहेत. काही खांब मोडकळीला आले असून ते झुकल्यामुळे त्यातून अपघाताची शक्यता आहे. हे पथदिवे पुन्हा सुरू झाल्यास नागरिकांची सोय होईल. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे असे निवेदनात नमूद केले आहे.
पथदिवे बंद असल्याने त्यावर केलेला ५ कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च वाया जात आहे. पथदिव्यांवर जनतेचा पैसा खर्च झाला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जात आहे. अधिकाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही? नागरिकांची गैरसोय होत आहे. पथदिवे सुरू न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.




