भुसावळ (प्रतिनिधी )-
कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील पायाभूत सुविधा किती चांगल्या दर्जाच्या आहेत यावर अवलंबून असते. केंद्र व राज्य शासनाने देशातील पायाभूत सुविधा जसे की दळणवळण, जलसिंचन व बांधकाम क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून प्रगत करण्याचे ठरविले आहे व त्यासाठी पावलेसुद्धा उचलेली आहेत. त्यामुळे सिव्हिल अभियंत्यांची मागणी शहरासह ग्रामीण भागात सुद्धा वाढली आहे अशी माहिती श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंग असोसिएशनचे मार्गदर्शक डॉ.पंकज भंगाळे यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते.
भारतात जलसंसाधन सिंचन आणि बांधकाम अभियांत्रिकी या सिव्हिल अभियांत्रिकीच्या शाखेद्वारे अन्न वस्त्र आणि निवारा यासारख्या मानवाच्या तिन्ही मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जातोय. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये इमारती पूल, रस्ते, रेल्वे, धरणे आणि सिंचन व्यवस्था, पाणी आणि सांडपाण्याची प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान दिले जात आहे असेही डॉ.भंगाळे म्हणाले.
इंटर्नशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग:
सिव्हिल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून भविष्यात कुशल इंजिनियर बनवण्याचे काम संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाकडून करण्यात येत असून यासाठी इंटर्नशिप डेव्हलपमेंट टेक्निकल प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यात येते. यावर्षी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एआयसीटीचा विश्वकर्मा अवार्ड दोन हजार एकोणवीस हा राष्ट्रीय स्तरावरील लाईव्ह प्रोजेक्ट प्रेसेंटेशन स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय स्थळावर दुसरे पारितोषिक मिळवले तसेच महाविद्यालयात ई-टेंडरिंग आणि कॉन्ट्रॅक्टर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास मदत होईल अशी माहिती प्रा.पंकज अत्तरदे यांनी दिली.
पायाभूत प्रकल्पाच्या बांधकामात जगभरातील गुंतवणुकीचा दर खूप जास्त आहे. मुलींना सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये चांगल्या संधी असून बऱ्याच मुली विविध शासकीय खात्यात उचस्थ पदावर स्थापत्य अभियंता म्हणुन कार्यरत आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागात जसे की पी.डब्ल्यु.डी, ईरिगेशन, एम.जे.पी, झे.पी., महानगरपालिका, टाऊन प्लानिंग इत्यादी, केंद्र शासनच्या विविध विभागात जसे की पोस्ट, रेल्वे, सी.डब्लू.सी., डिफेन्स, नी.री., सी.पी.ब्लू.डी इत्यादी, निम्न शासकीय विविध विभागात जसे की एन.टी.पी.सी., बि.एच.ई. एल., ओ.एन.जी.सी., ई.एस.आर.ओ., एच.पी.सी.एल., एस.ए.आय.एल., एम.आय.डी.सी. इत्यादी व खाजगी विविध क्षेत्रात जसे की रोड, ब्रिज, एव्हीगेशन, टॉवर, डॅम कन्स्ट्रक्शन इत्यादी क्षेत्रात विद्यार्थ्यांना नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत असे मत प्रा.धिरज चौधरी यांनी व्यक्त केले.
असोसिएशनचे सदस्य प्रसंगी प्रा.पंकज अत्तरदे, प्रा.प्रफुल्ल वानखेडे, प्रा. मनीष माटा, प्रा.सोहम कोल्हे, प्रा.सचिन हरीमकर, प्रा.धिरज चौधरी उपस्थित होते.



