भुसावळमध्ये भव्य तिरंगा रॅलीने साजरा झाला ‘कारगिल विजय दिवस’

नागरिक, विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले शहर
 
भुसावळ (प्रतिनिधी) : कारगिल विजय दिवसानिमित्त भुसावळ शहरात बियाणी एज्युकेशन ग्रुपतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ. संगीता बियाणी, उपाध्यक्ष विनोद बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, मनीष बियाणी यांच्यासह नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, पुरुषोत्तम नारखेडे, रुपेश देशमुख, सीमा नरवाडे, प्रशांत नरवाडे, प्रीती पाटील, बबलू बराटे, परीक्षित बराटे, संदीप सुरवाडे तसेच बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना मानवंदना देण्यात आली.

रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. बियाणी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ५० फूट लांबीचा विशाल तिरंगा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढली. या माध्यमातून नागरिकांमध्ये देशप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या भव्य तिरंगा रॅलीवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून उत्स्फूर्त स्वागत केले. संपूर्ण रॅलीदरम्यान देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.