जळगाव:- प्रतिनिधी - "भेटीलागी जीवा लागलीसे आस..." या विठ्ठल नामाच्या जयघोषात आषाढी एकादशीच्या अत्यंत पवित्र आणि मंगलमयी पर्वावर जळगावनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. "प्रति पंढरपूर" म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंप्राळा येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर प्रांगणात सकाळी आणि सायंकाळी महाबळ कॉलनी परिसरातील देवेंद्रनगर येथील श्री विठ्ठल मंदिरात 'भक्तीनाद' भजनसंध्येचा एक अद्भूत आणि अलौकिक सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध कलावंत,ऑर्गनायझर आणि निवेदक तुषार वाघुळदे प्रस्तुत 'भक्तीनाद' भजनसंध्या ग्रुपतर्फे विठू माऊलीच्या चरणी सुरांची भावपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात आली.विठू माऊलीच्या साक्षीनं सुरांची बरसात झाली. पिंप्राळा येथील सोहळ्यात टाळ-चिपळ्यांच्या गजर.. विठ्ठल नामाचा जयघोष आणि एकापेक्षा एक सरस सुमधूर भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
विठ्ठल नामाचा गजर करताना उपस्थित भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांतता आणि निस्सीम आनंद मिळाला. खरोखरच, हा सोहळा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि काळजाचा ठाव घेणारा एक नितांत सुंदर, अविस्मरणीय अनुभव ठरला.ही भक्तिमय सुरांची मैफिल मुख्य गायक निलेश पाटील, गायिका वृंदा पालखे, प्रवीण (आबा) पाटील, कल्याणी वाणी, गुलाब कापडणे आणि सोमनाथ शिंपी आदी कलावंतांनी आपल्या सुश्राव्य गायनाने कमालीची गाजवली. सायंकाळी महाबळ कॉलनी परिसरातील नूतन वर्षा कॉलनी येथील श्री विठ्ठल मंदिरात भक्तीगीतांची दुसरी मैफिल रंगली. सोहळ्याचा प्रारंभ अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या हस्ते विठुरायाची भावपूर्ण आरती करून झाला. या मैफिलीत 'भक्तीनाद' ग्रुपचे संचालक तुषार वाघुळदे, मुख्य गायक निलेश पाटील, गायिका वृंदा पालखे, प्रवीण पाटील आणि संयुक्ता बयाणी यांनी एकापेक्षा एक सुंदर भक्तीगीते सादर करून भाविकांची टाळ्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
विठूनामाच्या या अखंड जयघोषात उपस्थित भाविक भक्त पूर्णपणे तल्लीन झाले होते.या दोन्ही मैफिलींचे अत्यंत अभ्यासपूर्ण, रसाळ आणि मंत्रमुग्ध करणारे निवेदन संचालक तुषार वाघुळदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सुरेश पाटील यांनी मानले.अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.