वरणगाव पोलिसांची धडक कारवाई : सात गोवंश जनावरे व बोलेरो पिकअप जप्त; अवैध वाहतूक व कत्तलीचा संशय

भुसावळ (प्रतिनिधी) : वरणगाव शहरात गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक व संभाव्य कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, वरणगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सात गोवंश जनावरे आणि एक चारचाकी वाहन जप्त करून मोठे यश मिळवले आहे.

दि. १ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजेच्या सुमारास वरणगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गंगाराम कॉलनी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरे बांधून ठेवण्यात आली असून त्यांचा वापर अवैध वाहतूक किंवा कत्तलीसाठी होण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, एका पत्र्याच्या शेडमध्ये तसेच जवळच उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच १९ सीवाय ९७४३) वाहनात गोवंश जातीची जनावरे आढळून आली. तपासणीदरम्यान जनावरांना चारा-पाणी न देता अमानुषपणे बांधून ठेवल्याचेही निदर्शनास आले.

या कारवाईत अंदाजे ३ लाख ४९ हजार रुपये किमतीची एकूण सात गोवंश जनावरे (गाय व बैल) जप्त करण्यात आली. तसेच संबंधित बोलेरो पिकअप वाहनासह चालक राजीक रफीक कुरेशी (रा. गंगाराम कॉलनी, वरणगाव, ता. भुसावळ) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सदर जनावरे सोहेल शेख बशीर (रा. गंगाराम कॉलनी, वरणगाव) यांची असल्याची माहिती पोलिसांना दिली.

घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही जनावरे अवैध वाहतूक व कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जप्त करण्यात आलेली सर्व जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने गोशाळेत पाठवण्यात आली आहेत.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम, १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

वरणगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी सुकराम सावकारे, भूषण माळी, उमेश बारी, गोपीचंद सोनवणे, प्रेमचंद सपकाळे आणि श्रीकृष्ण देशमुख यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत.