जळगाव ( प्रतिनिधी )- अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यभरात धडक कारवायांना वेग आला असून, भेसळविरोधी मोहिमेनंतर आता प्रशासनाने हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांकडे मोर्चा वळवला आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत जळगावातील दोन तर भुसावळातील एका हॉटेलवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत करत शहरातील सर्व हॉटेल्सची सखोल तपासणी करण्याबरोबरच उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांवरही कारवाईची मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक केलेल्या तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्समध्ये अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळून आल्या. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची कोल्ड स्टोरेज व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, शिजविलेले व कच्चे अन्न एकत्र साठवणे, कालबाह्य अथवा लेबलविरहित साहित्याचा वापर तसेच स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान अनेक कर्मचाऱ्यांकडून हातमोजे, हेडकॅप आणि अॅप्रनचा वापर करण्यात येत नसल्याचेही अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. याशिवाय कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी न करणे, आवश्यक नोंदी व कागदपत्रे उपलब्ध नसणे, ग्राहकांच्या तक्रार निवारणाची व्यवस्था नसणे आणि अन्न हाताळणीबाबत आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव अशा अनेक त्रुटी आढळल्या. या तपासणी मोहिमेदरम्यान चार अन्न आस्थापनांकडे वैध अन्न व्यवसाय नोंदणी अथवा परवाना नसल्याचे उघड झाले. परवाना नसतानाही व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधित आस्थापनांना वैध नोंदणी अथवा परवाना प्राप्त होईपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे पालन केल्याशिवाय संबंधित आस्थापनांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेत जळगाव शहरातील अजिंठा रोड व एमआयडीसी परिसरातील हॉटेल त्रिमूर्ती आणि हॉटेल भानू या दोन हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील एका हॉटेलवरही नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नाशिक विभागात सुरू करण्यात आलेली ही विशेष मोहीम आगामी काळात अधिक व्यापक करण्यात येणार असून, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, मिठाई दुकाने, बेकरी तसेच अन्य अन्न आस्थापनांची नियमित व अचानक तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


