भुसावळ (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार 26 जून 2026 रोजी "आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दुरुपयोग व अवैध तस्करी विरोधी दिन" साजरा करण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना "नशामुक्त भारत अभियान – विकसित भारत की पहचान" अशी असून, या अभियानाच्या अनुषंगाने भुसावळ रेल्वे विभागामार्फत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या मालिकेत दिनांक 20 जून 2026 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली डीआरएम कार्यालयातून सुरू होऊन आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) पर्यंत जाऊन पुन्हा डीआरएम कार्यालयात परतली. रॅलीमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनीत अग्रवाल यांच्यासह विविध शाखांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या माध्यमातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली तसेच नशामुक्त समाज घडविण्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर दिनांक 22 जून 2026 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे "नशामुक्त भारत" स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानात विभागीय रेल्वे व्यवस्थापक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन सामूहिक नशामुक्ती शपथ घेऊन अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला. भुसावळ विभागामार्फत "नशामुक्त भारत अभियान" अंतर्गत पुढील काळात विविध जनजागृती कार्यक्रम, शपथविधी, प्रचार मोहीम तसेच सामाजिक सहभाग उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून अमली पदार्थांच्या व्यसनापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.



