भुसावळ (प्रतिनिधी) : राज्याचे मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह फोटो व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष (दक्षिण) तथा नगरसेवक किरण भागवत कोलते यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित यंत्रणांकडे निवेदन सादर करून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सामाजिक माध्यमांवर गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह व दिशाभूल करणारे फोटो हेतुपुरस्सर व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे जनमानसात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून समाजात असंतोष आणि द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच एका लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करून त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याबाबत चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह फोटो त्वरित हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी किरण कोलते यांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या खोट्या, आक्षेपार्ह व दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
यावेळी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरणगावात समर्थकांचे पोलिसांना निवेदन
वरणगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजनांची महिलेचा फोटो जोडून सोशल मीडियावर खोटी व दिशाभूल करणारी छायाचित्रे प्रसारित करून बदनामी केल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वरणगावात महाजन समर्थकांनी मोर्चा काढला.
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चानंतर वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सहा. निरीक्षक अमित कुमार बागुल यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सुनील काळे म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी छायाचित्रे प्रसारित करून मंत्री गिरीष महाजन यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून समाजात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा कट रचला गेला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
दरम्यान निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस सहा. निरीक्षक अमित कुमार बागुल यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. तसेच या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई न झाल्यास महाजन समर्थकांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला
यावेळी शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, जनसेवक मिलिंद भाईसे, कुंदन माळी, तेजस जैन, युवा अध्यक्ष आकाश निमकर, अन्सारी, रमेश पालवे, फझल भाई, अजमल भाई, हितेश चौधरी, कमलाकर मराठे, राहुल वंजारी, गणेश चौधरी, बळीराम सोनवणे, नामदेव मोरे, दत्तात्रय सूर्यवंशी, शालिग्राम पैसे, आयुब खान, निजाम मामू, दुर्गेश राजपूत, मयूर शेळके, जगन कोळी, साबीर कुरेशी, अरुण बावणे, छोटू सेवतकर, के.जी. अमृते, डॉ. सादिक शेख, पंकज चौधरी, संदीप माळी, नदीम शेख, मुन्ना लपलीकर, राहुल जंजाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.