भुसावळ (प्रतिनिधी ) –

सावदा महावितरण कंपनीने कृषी पंपांच्या वीजपुरवठ्यात कपात करून तो ८ तासांवरून ६ तास करण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घ्यावा लागला आहे. रावेर मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी थेट मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केल्यानंतर महावितरण प्रशासनाने तातडीने नमती भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास सलग वीजपुरवठा देण्याचे मान्य केले आहे.
राज्यात आजवर शेतीपंपासाठी २४ तासांपैकी ८ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, महावितरणच्या एका निर्णयामुळे हा पुरवठा ६ तासांवर आणण्याचा प्रस्ताव समोर आला होता. जळगाव जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णतेची लाट असून, जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळीच्या हजारो हेक्टर क्षेत्राला पाण्याअभावी मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली होती. आधीच नैसर्गिक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिक अडचणी वाढवणारा ठरणार होता.
वाढत्या तापमानामुळे केळी पिकाच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी पूर्ववत ८ तास नियमित आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती.
आमदार जावळे यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर महावितरण प्रशासनाची धावपळ उडाली. मुख्य अभियंत्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत शेतीपंपासाठी वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे ८ तासच करण्यात येईल, तसेच त्यासाठी तातडीने वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे दूरध्वनीवरून स्पष्ट आश्वासन दिले. याशिवाय वीजपुरवठा खंडित होणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.


