जळगाव/भुसावळ : जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाल्याने वाहनधारक, व्यापारी तसेच नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत असून काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. तर काही पंपांवर इंधन संपल्यामुळे विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पेट्रोल पंप चालक-मालक, व्यापारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, साठा व्यवस्थापन तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. वाढत्या टंचाईमुळे प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, भुसावळ शहरातही डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्रीपासून शहरातील तब्बल १० ते १२ प्रमुख पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फेऱ्या माराव्या लागत असून व्यापारी वर्गही हैराण झाला आहे.
इंधन टंचाईचा परिणाम मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच शेती आणि व्यावसायिक कामकाजावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या बैठकीनंतर परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


