भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड परिसरातील लाल बिल्डिंगजवळ अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. ही चोरी मयूर जाधव व मिलिंद जाधव यांच्या घरी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर जाधव व मिलिंद जाधव यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सामान कपडे अस्ताव्यस्त करून कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये पायातील साखळ्यांचे २ जोड, २ जोडवी, १ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १.५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, सुमारे ३.५ ग्रॅमची सोन्याची पोत, हाताचे व पायाचे ४ जोड कडे, १ ग्रॅमचे सोन्याचे पॅडल तसेच अंदाजे २५ ते ३० हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.
घरातील सदस्य परत आल्यानंतर घरातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी अद्याप पावेतो गुन्हा दाखल नसल्याची माहिती मयूर जाधव यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


