मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सन २०२६ च्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०२ टक्के लागला आहे. यावर्षीही मुलींनी चमकदार यश संपादन करत मुलांपेक्षा सरशी कायम राखली आहे.

मंडळाच्या माहितीनुसार, परीक्षेला बसलेल्या मुलींमध्ये ९४.९६ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा निकाल ८९.५६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे निकालात मुलींचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
राज्यातील विभागनिहाय निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला असून तो ८८.४१ टक्के इतका आहे.
यंदा पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातील एकूण १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ६६१२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांकनासाठी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ पद्धतीचा वापर करण्यात आला.
दरम्यान, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. अकरावीचे वर्ग वेळेत सुरू व्हावेत यासाठी यंदा दहावीची परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस आधी घेण्यात आली होती.
विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :
- कोकण – ९७.६२%
- कोल्हापूर – ९५.४७%
- मुंबई – ९४.९७%
- पुणे – ९४.२४%
- नाशिक – ९०.५३%
- अमरावती – ९०.५०%
- नागपूर – ८९.०७%
- लातूर – ८८.४२%
- छत्रपती संभाजीनगर – ८८.४१%
“दहावीच्या निकालात मुलींची पुन्हा चमक; कोकणचा दबदबा कायम!”


