भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील पापा नगर आणि काजी प्लॉट परिसरात भीषण आग लागून या घटनेत अनेक घरे बेचिराख झाले. दरम्यान राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि बाधित कुटुंबांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले.
या दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन देताना त्यांनी अग्निशमन दलाने केलेल्या तातडीच्या कार्याचे कौतुक देखील केले.

शहरातील पापा नगर आणि काजी प्लॉट परिसरात भीषण आगीची घटना घडून मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला पापा नगर भागातील एका घराला लागलेली आग काही क्षणांतच रौद्ररूप धारण करत आसपासच्या आणखी दोन घरांमध्ये पसरली. यात संसारोपयोगी वस्तू व रोख ४०हजार रुपये जळून खाक झाले. जोरदार वाऱ्यामुळे आगीचा फैलाव अधिक वेगाने झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घरातील सदस्यांनी वेळीच बाहेर पडत आपला जीव वाचवला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, गजबजलेल्या वस्तीत आग लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन ते चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि आणखी मोठे नुकसान टाळले. तरीही या आगीत काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.



