वाचन संस्कृती अभियान सप्ताह अंतर्गत श्रीराम कथा आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न.


भुसावळ (प्रतिनिधी) –
वांजोळा रोड वरील आपले परिवार सार्वजनिक वाचनालय द्वारा दिनांक २३ ते ३० एप्रिल “वाचन संस्कृती अभियान सप्ताह” अंतर्गत सप्ताहाच्या चौथ्या दिवशी दिनांक २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीरामकथा आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मुरलीधर भारंबे होते. सुरुवातीस सेवानिवृत्त पर्यवेक्षक अनिल फेगडे, सुरेश कोल्हे यांनी श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्प माला अर्पण करून पूजन केले. दिप प्रज्वलन लिटिल फ्लॉवरच्या संचालिका सौ. संजीवनी यावलकर, सुरेश कुलकर्णी,लक्ष्मण पाटील, कु. वेदांती सराफ, अनिल फेगडे, शांताराम पाटील आदींनी केले.
सौ. संजीवनी यावलकर श्रीराम कथा भाग संक्षिप्त निवेदन करीत नंतर सदर कथा भागावर सहज, साधे, सोपे, सुलभ, सामान्य प्रश्न विचारले असता वय वर्षे 3 ते 12 पर्यंतच्या मुल – मुलींनी उस्फूर्तपणे उभे राहून उत्तरे दिलीत. अचूक अपेक्षित उत्तर देणाऱ्यास लगेच बक्षीस दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साह क्षणाक्षणाला वाढत होता. सदर उपक्रमात निवेदन, श्रवण, प्रश्न-उत्तर, सादरीकरण यामुळे उपस्थितांचा उत्साह सातत्याने वाढत राहिला.

उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पेन्सिल, पेन, चॉकलेट, पुस्तक, मसाला ताक पाऊच देऊन सन्मानित करण्यात आले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमानंतर सर्वांनी पुस्तक प्रदर्शन, पोस्टर्स, दैनिक वृत्तपत्र कात्रण संग्रह-प्रदर्शनाची कुतूहल पूर्वक पाहणी केली. प्रदर्शन पाहणाऱ्या प्रत्येकास हितगुज आत्मकथा पुस्तक भेट दिले जात होते.

सदर दिवशी लग्न तिथी असल्यावरही विद्यार्थी व पालकांचा उत्साह प्रशंसनीय होता. कु. वेदांती सराफ व कु. मौल्या पाटील यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. तदनंतर जय श्रीराम घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. शेवटी कार्यक्रमाची संकल्पना व संयोजक शांताराम पाटील यांनी सर्व उपस्थित यांचे जाहीर आभार मानले पालकांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक केले.