भुसावळात राजकीय वर्तुळात भूकंप; नगराध्यक्षा गायत्री गौर भंगाळे यांचा जात दाखला अवैध

भुसावळ (प्रतिनिधी): शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत नगराध्यक्षा गायत्री गौर/भंगाळे यांनी सादर केलेला अनुसूचित जातीचा (SC) जात दाखला अनुसूचित जाती जात पडताळणी समिती, जळगाव यांनी अवैध ठरवला आहे. गुरुवारी (दि. २३) झालेल्या या निर्णयामुळे भंगाळे यांच्या पदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली असून भुसावळातील राजकीय वातावरण तापले आहे.

पालिका निवडणुकीत अनुसूचित जाती महिला राखीव जागेवरून निवडून आलेल्या भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत संजय भागवत तायडे, राहुल वसंत तायडे, रजनी संजय सावकारे आणि प्रमोद वामन सावकारे यांनी तक्रार दाखल केली होती. भुसावळ प्रांताधिकारी यांनी जात दाखला देताना आवश्यक कागदपत्रांची व पुराव्यांची योग्य पडताळणी केली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीची चौकशी करताना समितीने संबंधित दाखला अवैध ठरवला.

जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीसची तयारी

या निर्णयानंतर आता जिल्हाधिकारी गायत्री गौर – भंगाळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. जात दाखल्याची वैधता सिद्ध न झाल्यास किंवा पडताळणी अपुरी ठरल्यास, जिल्हाधिकारी तक्रारीवरून किंवा स्वतःहून (सुमोटो) कारवाई करत भंगाळे यांना अपात्र ठरवू शकतात.

अपीलकडे लक्ष

दरम्यान, समितीच्या निर्णयाविरोधात भंगाळे उच्च प्राधिकरण किंवा न्यायालयात अपील करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर त्यांनी अपील केले, तर या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळण्याची शक्यता आहे.

राजकीय वातावरण ढवळून निघाले

या घडामोडींमुळे भुसावळात राजकीय पारा चांगलाच वाढला असून सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेतील निर्णयांवरच भंगाळे यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय अवलंबून राहणार आहे.