भुसावळात दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेचा उपक्रम;

भुसावळ (प्रतिनिधी) – भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेतर्फे “योग्य दिशा – उज्ज्वल भविष्याची हमी” या संकल्पनेवर आधारित दहावी व बारावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायतचे कुटुंबनायक ललित दादा पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात भुसावळ विभागाचे अध्यक्ष सुहास चौधरी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन आवश्यक असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास भुसावळ नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये किरण कोलते, पल्लवी कोलते, निलेश कोलते, आशा पाटील, सोनल महाजन, बापू महाजन, उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे, पुरुषोत्तम नारखेडे, डॉ. प्रसाद बोंडे, अॅड. बोधराज चौधरी, प्रिया चौधरी, मेघा वाणी, बबलू बऱ्हाटे, पूनम बोरोले, गुणवंत बोरोले, सुजित भोळे, दिपाली बऱ्हाटे, सचिन पाटील, मीनाक्षी धांडे, प्राची पाटील, डॉ. छाया फालक आदींचा समावेश होता. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात समुपदेशक आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योग्य माहितीअभावी चुकीचे निर्णय घेतले जातात, त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संचालिका संध्या वराडे यांनी किशोर पाटील यांची ओळख करून दिली. पाटील यांनी स्टेनोग्राफी क्षेत्रातील संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांची ओळख संचालिका कावेरी चौधरी यांनी करून दिली. डॉ. लेकुरवाळे यांनी ओघवत्या व प्रभावी शैलीत UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. कोणतेही क्षेत्र चांगले किंवा वाईट नसते, तर त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची जिद्द महत्त्वाची असते, असे त्यांनी सांगितले. तसेच आई-वडील हेच खरे आदर्श असून समूहात अभ्यास केल्यास अधिक प्रभावीपणे ज्ञान आत्मसात होते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. सूत्रसंचालन सुभाष भंगाळे यांनी केले.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व समाजबांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनात संचालक महेश फालक, आर.जी. चौधरी, अनिल वारके, शरद फेगडे, हरीश फालक, चेतन पाटील, संजय पाटील, धनंजय पाटील, धीरज पाटील, कावेरी चौधरी, संध्या वराडे, मंगला पाटील तसेच निलेश भोळे, अशोक कोळी, जगदीश फिरके, नितीन बऱ्हाटे आदींचा सहभाग होता.

शेवटी सुभाष भंगाळे यांनी आभार प्रदर्शन केले.